Sangli News : सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क एक लाखाचा बैल भेट म्हणून दिला आहे. पाच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संजयकाका पाटील यांनी तासगावमध्ये चक्काजाम आंदोलन केलं होतं. या आंदोलनामध्ये संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.
तासगाव तालुक्यातील निमणी येथील एक तरुण शेतकरी श्याम राजमाने हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपल्या एका बैलासह औताला स्वत: बांधून बैलगाडी घेऊन आला होता. तो पाच किलोमीटरपर्यंत अनवाणी पायाने चालत आला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संजय काका पाटील यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचला.
आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाची संजयकाका पाटील यांनी विचारपूस केली. तरुणाकडे एकच बैल होता. संजयकाका पाटील यांनी श्याम राजमाने याला एक लाखांचा बैल भेट म्हणून दिला आहे. संजयकाका पाटील यांची चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट शाम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधत ही भेट दिली आहे. दोन्ही घटनांमुळे तालुक्यात सध्या कार्यकर्ता आणि त्याचा नेता कसा असावा याची चर्चा रंगली आहे.