संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur Vitthal Temple : जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सरकारने कमर्शियल गॅस सिलेंडरच्या वितरणावर बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला असून गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. पर्यटनासाठी किंवा तीर्थयात्रेसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न यामुळे गंभीर झाला आहे. मात्र, अशा संकट काळातही पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या जेवणाची सोय अखंडित सुरू राहणार आहे.
हॉटेल बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत असताना, वारकरी आणि पर्यटकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या या तीर्थक्षेत्रात पंढरपुरने विठोबाच्या अन्नछत्राने मोठा आधार दिला आहे. येथील गॅस पुरवठा नियमित सुरू राहणार असल्याने बाहेर हॉटेल बंद असली तरी भाविकांचा पोटोबा मात्र व्यवस्थित होणार आहे.
मंदिर समितीचे मोठे नियोजन
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला दर महिन्याला 150 गॅस सिलेंडरची आवश्यकता भासते. इंधन तुटवड्याचे संकट पाहता, मंदिर समितीने तातडीने गॅस वितरक आणि प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या अन्नछत्राला गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित आणि प्राधान्याने करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे इंधन टंचाईची झळ विठ्ठलाच्या या महाप्रसादाला बसणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
( नक्की वाचा : Badlapur News: होम लोन फेडलं तरी घर होणार सील? बदलापुरातील 'या' हायप्रोफाईल सोसायटीत खळबळ! )
हजारो भाविकांना मिळणार आधार
पंढरपूरमध्ये दररोज साधारणपणे 40000 ते 50000 भाविक दर्शनासाठी येत असतात. यातील किमान 10000 भाविक दररोज अन्नछत्रातील महाप्रसादाचा लाभ घेतात. शहरात कमर्शियल गॅसअभावी हॉटेल्स बंद झाली तरी विठ्ठल भक्तांना उपाशी राहावे लागणार नाही. सर्वसामान्य नागरिक, पर्यटक आणि प्रवाशांसाठी मंदिर समितीचा हा निर्णय मोठा आधार ठरणार आहे.
पर्यायी व्यवस्थेचीही तयारी
केवळ सध्याचा पुरवठाच नाही, तर भविष्यात जर इंधन तुटवड्याची परिस्थिती अधिक गंभीर झाली तरी मंदिर समिती सज्ज आहे. अशा वेळी पर्यायी इंधन व्यवस्था किंवा अन्न निर्मितीच्या इतर पद्धतींचा वापर करून महाप्रसाद सुरू ठेवण्याचे नियोजन आत्तापासूनच करण्यात आले आहे. भाविकांचा महाप्रसाद कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
( नक्की वाचा :Minister Scandal : 'हो, माझे 5000 अफेअर्स आहेत!"; पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर बड्या मंत्र्याची निर्लज्ज कबुली )
संकट काळातील तत्परता
यापूर्वी कोरोना काळ असो किंवा महापुराचे संकट, पंढरपूरचे हे अन्नछत्र लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहिले आहे. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईतही हॉटेल बंद असले तरी विठ्ठलाचा हा महाप्रसाद भाविकांना तृप्ती देणारा ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world