Mumbai AC Local News: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत मुंबई रेल्वे विकास निगम लि. (एमआरव्हीसी) ने 2,856 पूर्ण वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदी व दीर्घकालीन देखभालीसाठी ई-प्रोक्युअर संकेतस्थळावर ई-निविदा जाहीर केली आहे. हे रॅक 12, 15 व 18 डब्यांच्या रचनेत, गरज व परिचालनाच्या व्यवहार्यतेनुसार, उपलब्ध केले जातील. यामुळे प्रवासी क्षमता, सोय व सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
सध्या मुंबईतील बहुतेक उपनगरीय गाड्या 12 डब्यांच्या रॅकसह चालवल्या जातात, तर 15 डब्यांच्या रॅकसह केवळ काहीच सेवा सुरू आहेत. भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी या खरेदीत मोठ्या प्रमाणावर 15 डब्यांच्या सेवांचा व आवश्यकतेनुसार 18 डब्यांच्या रॅकचा समावेश आहे.
Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
6 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) फेज III व IIIA अंतर्गत अपलोड करण्यात आलेली ही निविदा, केवळ आधुनिक रॅक पुरवण्यावरच नव्हे तर पुढील 35 वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीवर देखील भर देते. दोन अत्याधुनिक मेंटेनेंस डेपो — मध्य रेल्वेवरील भीवपूरी येथे व पश्चिम रेल्वेवरील वाणगांव येथे — विकसित केले जातील. निविदा सादरीकरण 8 डिसेंबर 2025 पासून सुरू होईल व निविदा उघडण्याची तारीख 22 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाईल, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात समावेश होईल.
वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांची प्रमुख वैशिष्ट्ये
• वातानुकूलित, पूर्णपणे वेस्टिब्यूल्ड रॅक
• जास्त त्वरण व ब्रेकिंग क्षमता, वेळेवर धावण्यासाठी उपयुक्त
• सुरक्षासाठी स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली
• आधुनिक आतील सजावट, गादीदार आसन, मोबाइल चार्जिंग पॉईंट व माहितीप्रद प्रणाली
• 130 कि.मी. प्रति तास पर्यंत वेग क्षमता
• दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे (स्वतंत्र एसी डक्टसह)
• उच्च क्षमतेचे एचव्हीएसी - मुंबईच्या हवामानातील प्रवाशांच्या आरामाची खात्री करणे
• जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणाली, ज्यामध्ये सुधारित ब्रेकिंग आणि प्रवासी प्रवाह डिझाइनचा समावेश आहे
श्री विलास सोपन वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी म्हणाले की, “2,856 वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांची ही महत्त्वाकांक्षी खरेदी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक मोठा बदल घडवून आणेल. 12, 15 व 18 डब्यांचे अधिक लांब, जलद व सुरक्षित रॅक सुरू करून आम्ही गर्दी कमी करणे तसेच वेळेवर सेवा व प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करणार आहोत. स्वयंचलित दरवाजे, प्रगत तांत्रिक वैशिष्ट्ये व जागतिक दर्जाची देखभाल सहाय्य यांसारख्या आधुनिक सुविधांसह एमआरव्हीसी लाखो दैनंदिन प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी भविष्याभिमुख उपनगरीय रेल्वे देण्यासाठी कटिबद्ध आहे.