सुनील दवंगे, अहिल्यानगर
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून 'भोंदुगिरी' प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील वडगाव पान येथे 'दत्तधाम सरकार' नावाने आश्रम चालवणारे राजेंद्र गडगे (स्वयंघोषित गडगे महाराज) यांच्या कार्यपद्धतीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कॅन्सर बरा होतो? वादाचे मुख्य कारण
राजेंद्र गडगे हे आपल्या आश्रमात 'दरबार' भरवून भक्तांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. विशेषतः वैदिक पद्धती, ध्यानसाधना आणि मनाची 'संकल्पशक्ती' वाढवून कॅन्सरसारखे गंभीर आजारही बरे होऊ शकतात, असा दावा त्यांनी केल्याची चर्चा आहे. याच दाव्यामुळे अंनिसने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
(नक्की वाचा- Ashok Kharat: खरातच्या कार्यक्रमात गेले, हसत-हसत भाषणही ठोकलं; वरिष्ठ IPS अधिकारी गोत्यात? VIDEO समोर)
कोणाचे काय म्हणणे?
अंनिसच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांचा आरोपी आहे की, हा चमत्काराचा प्रकार नसून भक्तांचे आर्थिक आणि मानसिक शोषण आहे. कॅन्सरसारख्या आजारावर उपचाराच्या नावाखाली दिशाभूल केली जात आहे. प्रशासनाने तातडीने फौजदारी गुन्हे नोंदवून आश्रमावर कारवाई करावी.
तर राजेंद्र गडगे यांनी भूमिका मांडताना म्हंटलंय की, "मी भोंदू नाही, माझी तुलना अशोक खरातशी करू नका. गेल्या 38 वर्षांपासून वडिलोपार्जित जागेत सेवा देत असून मी कोणताही चमत्कार करत नाही. तेथे असलेले मेडिकल स्टोअर आणि माझा थेट संबंध नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे."
(नक्की वाचा- VIDEO: स्वयंचलित दरवाजे, मोठ्या खिडक्या अन् बरंच काही; अॅडव्हान्स लोकल ट्रेन मुंबईत दाखल, पण...)
वडगाव पान येथील या आश्रमात घरगुती वाद, शारीरिक व्याधी आणि मानसिक त्रासाने त्रस्त असलेले शेकडो भक्त दररोज येतात. "चुटकीसरशी इलाज" या चर्चेमुळे येथे मोठी गर्दी होत असली तरी, अंनिसच्या मते हे केवळ भीती आणि श्रद्धेचा फायदा घेण्याचे साधन आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आता प्रशासन या दाव्यांची सत्यता तपासणार का आणि 'जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत' कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.