Gadchiroli News : हा आहे विकास? गावात रुग्णवाहिका पोहोचणं कठीण, वेदनेने विव्हळत रुग्णाचा जीवघेणा प्रवास

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातून विकासाच्या दाव्यांना हादरा देणारं चित्र समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातून विकासाच्या दाव्यांना हादरा देणारं चित्र समोर आलं आहे. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना चक्क खाटेचा आणि नावेचा आधार घ्यावा लागला. 

गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही आणि रुग्णाला जीवघेणा आणि वेदनादायी असा प्रवास करावा लागला. बंगाडी गावातील संतोष जेट्टी हे संसर्गजन्य आजाराने त्रस्त होते. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने लाहेरी उपकेंद्रात दाखल करणं आवश्यक होतं. मात्र गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील गुंडेनूर नाल्यामुळे रुग्णवाहिकेला गावापर्यंत पोहोचणं अशक्य झालं.

Advertisement

रुग्ण वेदनेने तडफडत असताना जीवघेणा प्रवास...

रुग्णाची प्रकृती गंभीर असताना कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभं ठाकलं होतं. अखेर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी संतोष जेट्टी यांना खाटेवर झोपवून खडतर आणि चिखलमय मार्गाने नाल्यापर्यंत आणले. त्यानंतर नावेच्या साहाय्याने नाला पार करून रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. रुग्ण वेदनेने तडफडत असताना त्याला अशा परिस्थितीत प्रवास करावा लागणे ही बाब प्रशासनाच्या दुर्लक्षाचं जिवंत उदाहरण असून हा विकास आहे का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

नक्की वाचा - KDMC रुग्णालयातील डॉक्टरांचा अक्षम्य निष्काळजीपणा, सिझेरियनदरम्यान गोधडीप्रमाणे...; महिलेच्या जीवाला धोका

गुंडेनूर नाल्यावर पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच आहे. दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील अनेक गावे संपर्कविहीन होतात. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पुलाचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.