संजय तिवारी, गडचिरोली: माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या नवनिर्मित पोमकें पेनगुंडा हद्दीतील माओवाद्यांचे स्मारक गडचिरोली पोलीस दलाने उध्वस्त केले आहे. पेनगुंडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी स्मारक उभे केले होते. हे स्मारक जमीनदोस्त करुन पोलिसांनी माओवाद्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नुकतेच 11 डिसेंबर रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. मात्र शनिवार 28 डिसेंबर रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा ते नेलगुंडा रोडवर पेनगुंडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्यांचे स्मारक बांधलेले आहे अशी गोपनिय माहिती मिळाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानुसार, गडचिरोली पोलीस दलाच्या बिडीडीएस, प्राणहिता व विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान केले असता, पेनगंडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. बिडीडीएस पथकाने सदर परिसराची कसुन तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी सदर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक उध्वस्त केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगड, गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपासून नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये वारंवार चकमक होत असून यामध्ये अनेक बड्या माओवादी नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीला आळा बसत आहे.