बीड: मस्सजोगचे सरपंच सरपंच देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणांमधील मुख्य आरोपी फरार आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. अत्यंत निर्घृण अशा हत्येमधील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच याप्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती ्अशी की, बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार आरोपींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चे CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेल्या धक्कादायक आकडेवारीनंतर शस्त्र परवानाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1222 शस्त्र परवानाधारक व्यक्ती असून इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला होता. यामध्ये यांपैकी परभणीत 32, अमरावती ग्रामीणमध्ये 243 शास्त्र परवाने आहेत. बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने हे परवाने देण्यात आले? असंही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल सर्व पक्षांकडून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे ,मनोज जरांगे पाटील, यांच्यासह विविध नेते सहभागी झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world