एकीकडे लग्नासाठी मुली मिळत नाही, दुसरीकडे त्याचाच फायदा घेत, खोटे आईवडील व मुलगी दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय आहे. लग्नाचे खोटे नाटक करून पैसे लुबाडणाऱ्या टोळीला एमआयडीसी वाळुज पोलिसांनी अटक केली आहे. कुंडलिक शाहू चव्हाण (वय 54), कल्पना प्रकाश मुराळकर (वय 47), संगीता कुंडलिक चव्हाण (वय 42) अशी आरोपींची नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च 2024 रोजी फिर्यादी हरिश्चंद्र कुबेर (वय 33) यांची आरोपी कुंडलिक चव्हाण यांचासोबत लग्नाबद्दल बोलणी झाली. लग्न लाऊन देण्याच्या बदल्यात 3 लाख रुपये मोबदला आरोपी कुंडलिक चव्हाण याने मागितला. फिर्यादी कुबेर यांना विश्वास बसल्याने त्यांनी होकार देत 27 मार्च 2024 रोजी नातेवाईकांच्या समक्ष कुसुम अजय चव्हाण हिचे कुबेर याच्यासोबत गेवराई येथे लग्न लावण्यात आले.
(नक्की वाचा- पार्किंगचं क्षुल्लक कारण, पुण्यात भररस्त्यात भारतीय सैन्य दलातील माजी अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू)
लग्नानंतर आरोपीने फिरीदाईकडून ठरलेले 3 लाख रुपये घेतले. दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी मुलगी कुसुम हिने चुलत भाऊ मरण पावला असे सांगून निघून गेली. त्यानंतर वारंवार संपर्क करून सुद्धा मुलगी कुसुम येत नसल्याने फिर्यादीने लग्न जुळवून आणलेल्या आरोपी कुंडलिक चव्हाण याला संपर्क केला. त्यावेळी तो देखील उडवाउडवीचे उत्तर देत होता.
फिर्यादी कुबेर यांना संशय आल्याने जोगेश्वरी येथे जाऊन चौकशी केली असता, ही एक टोळी असून या टोळीने अनेक मुलांना व कुटुंबांना गंडा घातल्याच कुबेर यांना लक्षात आहे. त्यांनी तत्काळ एमआयडीसी वाळुज पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. गुन्ह्यातील तपासात एका आरोपींसह दोन महिलांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता कुबेर यांचासह सातारा, सुरत (गुजरात ) काहींची फसवणूक केल्याचे कबूल केले.
(नक्की वाचा- कोंडीत मुंबईतील 22 किलोमीटरचे अंतर 19 मिनिटात पार, रुग्णाला मिळालं जीवनदान)
आरोपींनी सिल्लोड, वैजापूर, नेवासा, मालेगाव, कापडणे, धुळे, अहमदनगर, नाशिक येथेही खोटे लग्न लावून पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ह्या टोळीने फसवणूक केली असून गुन्हा उघड झाल्यानंतर अनेक तक्रारी नोंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.