Gauri Ganpati Visarjan: गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौराईचेही अनेक घरांमध्ये आगमन झाले आहे. 31 ऑगस्ट रोजी गौरी गणपती बाप्पासोबत भक्तांच्या घरी विराजमान झाल्या. गणपती बाप्पाप्रमाणेच गौरींसाठीही छान आरास केली जाते, गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. गौरीच्या आगमनामुळे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे झालेला आनंद द्विगुणित झालेला असतो. यंदा 2 सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन (Gauri Visarjan 2025) केले जाणार आहे. सोबतच 7 दिवसांच्याही गणपतीचे 2 सप्टेंबर रोजी विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) केले जाणार आहे. 7 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर वेध लागतील ते अनंत चतुर्दशीचे. 10 दिवसांच्या गणरायाला शनिवार म्हणजेच 6 सप्टेंबरला निरोप दिला जाणार आहे.
अनंत चतुर्दशी कधी आहे ?
गणपती बाप्पा आपल्या घरी येतो आणि सोबतच सुखसमृद्धी, भरभराट घेऊन येतो अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. सुखकर्ता आणि दुखहर्ता असलेल्या विघ्नविनाशक गणरायाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात अश्रू दाटलेले असतात. शनिवार, 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या विसर्जनासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे भव्य स्वरूप पाहता, या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे. या दिवशी केवळ गणपती विसर्जन नाही, तर भगवान विष्णूच्या अनंत रूपाचीही पूजा करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते.
(नक्की वाचा: Benefits Of Offering Durva To Ganesha: गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचे लाभ आणि नियम माहितीयेत?)
अनंत चतुर्दशी (6 सप्टेंबर 2025) रोजी विसर्जनासाठी शुभ वेळ कोणती? (Auspicious Timings For Visarjan )
- सकाळची शुभ वेळ: 07:36 AM ते 09:10 AM
- दुपारची शुभ वेळ: 12:17 PM ते 04:59 PM
- सायंकाळची शुभ वेळ: 06:33 PM ते 07:59 PM
- रात्रीची शुभ वेळ: 09:25 PM ते 01:44 AM (सप्टेंबर 07)
- पहाटेची शुभ वेळ: 04:36 AM ते 06:02 AM (सप्टेंबर 07)
भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर गणपती बाप्पा पुन्हा कैलास पर्वती परततात असे मानले जाते. गणरायाला भक्त निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करूनच निरोप देतात. विसर्जन हे निसर्ग चक्राचे प्रतीक आहे असे मानले जाते.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: You Tubeवरील मंत्र ऐकून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं योग्य आहे का?)
पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार
गणेश विसर्जनाच्या वेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' अशी विनंती गणेशभक्त गणेशाला करतात. मात्र पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने गणपती बाप्पांचे आगमन 18 दिवस उशिरा होणार आहे. पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन सोमवारी, 14 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.