निनाद करमरकर, प्रतिनिधी
गेट-वे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेत 10 प्रवासी आणि तीन नौदलच्या कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत सात वर्षांचा चिमुकला जोहान पठाण याचाही मृत्यू झाला. गेटवे ऑफ इंडियामधल्या अपघातात जोहानचा दहा महिन्यांचा छोटा भाऊ अजान आणि वडील पठाण या दुर्घटनेत बचावलेत. मात्र जोहान आणि अजानच्या आईचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. पठाण कुटुंबीय गोव्याहून दोन दिवसांसाठी मुंबईला फिरण्यासाठी आले होते.
नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा Video समोर
कुलाब्यात खरेदी केल्यानंतर त्यांना समुद्रात बोटीतून फिरायचं होतं. मोहम्मद पठाण, त्यांची पत्नी शफिना पठाण, मोठा मुलगा जोहान, धाकटा मुलगा अजान आणि त्यांची मेव्हणी सोनाली गावंडर असे पाच जण बोटीत बसले. त्याचवेळी नेव्हीच्या बोटीचा नीलकमल बोटीला धक्का लागला. मोहम्मद पठाण आणि सोनाली यांनी लाईफ जॅकेट घातलं असल्यानं ते बचावले. दहा महिन्यांचा अजान त्याच्या वडिलांच्या हातात होता. एका जर्मन नागरिकानं अजानला त्याच्या वडिलांच्या हातातून घेऊन वाचवलं. अपघात झाला त्यावेळी लाईफ जॅकेटसाठी एकच धावपळ झाली. लाईफ जॅकेट घेण्यासाठी मोहम्मद यांची पत्नी शफिना आणि मुलगा जोहान बोटीच्या खालच्या भागात गेले. दोघांनाही लाईफ जॅकेट मिळाली नाहीत. दोघेही बोटीच्या वरच्या भागात जाऊ लागेल. तेवढ्यात बोट बुडली. बोटीबरोबर आई आणि मुलगा दोघेही बुडाले.
नक्की वाचा - फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत
गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत बदलापूरच्या मंगेश केळशीकरांचाही मृत्यू झाला आहे. मंगेश नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होते. नेव्हीच्या ज्या स्पीड बोटीची चाचणी सुरू होती, त्या बोटीमध्ये मंगेश होते. बोट धडकल्यानंतर मंगेश यांचा मृत्यू झाला. केळशीकर कुटुंबीयांमध्ये मंगेश एकमेव कमावता आधार होता. त्यांच्या पश्चात आई, चार वर्षांचा मुलगा आणि गर्भवती पत्नी आहे. बोटीमध्ये जितके प्रवासी तितके लाईफ जॅकेटस असायलाच हवी होती. लाईफ जॅकेटस असती तर सगळ्यांचे जीव वाचले असते.