राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोमची (Pune Guillain-Barre Syndrome) रुग्णसंख्या 111 वर पोहोचली आहे. याशिवाय 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे पुणेकरांची (Pune GBS) चिंता वाढली आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत. या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
दुसरीकडे महापालिका आयुक्तांनीही या विहीरीमुळे साथ पसरली असल्याचं सांगितलं. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहे.
नक्की वाचा - GBS Update : पुण्यात जीबीएस रुग्ण शंभरीपार, ही 3 लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका!
पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यांनी नांदेड परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या जीबीएस रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.
गुईलेन बॅरे सिंड्रोमचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो?
जीबीएसमध्ये प्राथमिक पातळीवर ताप, खोकला आणि श्वसन घेण्यास त्रास जाणवतो. इतर वेळी बाहेरील विषाणू किंवा बॅक्टेरियावर हल्ला करणारी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात.
- मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात.
- थकवा जाणवतो.
- हातापायाला मुंग्या येतात
- पायांपासून याची सुरुवात आणि चेहऱ्यापर्यंत पसरते.
- काहींना पाठदुखीचा त्रास.
- स्नायू कमकुवत होतात, हाता-पायांतील त्राण जातो.
- श्वास घ्यायला आणि गिळायला त्रास