Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC)चे माजी जीएम मनोज चंसोरिया यांचाही मृत्यू झाला आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये ते निवृत्त झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चंसोरिया पत्नी अनिता यांच्यासह व्हिसाच्या कामानिमित्त मुंबईमध्ये आले होते. काम आटोपल्यानंतर दोघंही सोमवारी (13 मे 2024) जबलपूरकडे परतत होते. तेव्हा गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते घाटकोपरजवळील पेट्रोल पंपवर थांबले. त्याच वेळेस वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आणि महाकाय होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेमध्ये पती-पत्नी दोघंही होर्डिंगखाली दबले गेले.
पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तक्रार
मनोज यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशामध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाने आईवडिलांना फोन केला, तेव्हा कोणतेही उत्तर मिळाले नाही. यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने त्याने पोलीस स्टेशनमध्ये पालक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले तेव्हा घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेचे लोकेशन त्यांना आढळले. यानंतर त्यांचे नातेवाईक आणि एटीसीमधील अधिकारी-कर्मचारी दिवसभर घटनास्थळी त्यांचा शोध घेत होते. अखेर रात्री 12 वाजेदरम्यान दोघांचेही मृतदेह लाल रंगाच्या गाडीतून बाहेर काढण्यात आले.
(नक्की वाचा: होर्डिंग दुर्घटनेवरून राजकारण तापलं; सत्ताधारी-विरोधकांचे आरोप प्रत्यारोप)
वादळीवाऱ्यामुळे पडले होर्डिंग
सोमवारी (13 मे 2024) संध्याकाळी मुंबईमध्ये वादळीवारे आणि जोरदार पावसामुळे 100 फूट उंच आणि 250 टन वजनाचे होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळले. या दुर्घटनेमध्ये पेट्रोल पंपवरील कित्येक वाहने होर्डिंगखाली दबली गेली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 89 लोकांना बाहेर काढण्यात आले. यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
(नक्की वाचा: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 'त्यांनी' सांगितला अंगावर काटा आणणारा थरार)
आतापर्यंत का हटवण्यात आले नाही होर्डिंग?
होर्डिंगचे वजन इतके आहे की मशीन आणि गॅस कटरच्या वापराविना ते काढले जाऊ शकत नाही. मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पेट्रोल पंपवर जमिनीच्या खाली इंधनाच्या टाक्या असल्याने आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही गॅस कटर वापरत नाही". पण गॅस कटरचा वापर होत नसल्याने ढाचा काढण्यास समस्या निर्माण होत आहे आणि वेळ देखील लागत आहे".
(नक्की वाचा: रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता)
चौथ्या दिवशीही बचावकार्य सुरू
घाटकोपर दुर्घटना घडून चार दिवस उलटले आहेत. चौथ्या दिवशीही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा 16 वर पोहोचला असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे म्हटले जात आहे.