सुमीत पवार, प्रतिनिधी
Marathwada Heavy Rain : अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून संभाजीनगरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात असलेल्या शिऊर येथील एका मुलीची अचानक रात्री प्रकृती बिघडली, त्या मुलीला रुग्णालयात घेऊन जाताना ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब लागला. 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात जाण्यासाठी त्यांना तब्बल 2 तास लागला. परिणामी त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. वैष्णवी योगेश जाधव असे मृत तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे 10 दिवसांत घरात आजोबांच्या मृत्यूनंतर नातीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - School Holiday : मुंबई, पुणे, ठाणे अतिमुसळधार पावसाचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर
संभाजीनगरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
खबरदारी म्हणून संभाजीनगरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, हवामान विभागाने वर्तविलेल्या संभाव्य पावसाची परिस्थिती आणि आज निर्माण झालेला पुराचा धोका लक्षात घेता 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
पैठण शहरात पाणी शिरलं...
छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या जायकवाडी धरणातून कालपासून तब्बल दोन लाखापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल रात्री हा विसर्ग वाढवून दोन लाख 92 हजार करण्यात आला. त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील पाणी घुसले आहे. त्यामुळे रात्रभर व्यापाऱ्यांकडून दुकाने रिकामी केली जात होती.