सोन्याचे भाव एक लाखापर्यंत जातील अशी स्थिती होती. गेले काही दिवस सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. पण आता त्या भावात अचानक घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात आज सोमवारी 400 रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसात सोन्याच्या भावात 3 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्या चांदीच्या दरात ही घसरण झाल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोन्या बरोबरच चांदीचे दरही घसरले आहेत. चांदीच्या भावात 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोमवारी जीएसटी विना सोन्याचे भाव 88 हजार 600 तर चांदीचे भाव 90 हजार रुपयांवर आले आहे. तर जीएसटीसह सोन्याचे दर 91 हजारांवर तर जीएसटीसह चांदीचे दर 92 हजार 700 रुपयांवर आले आहेत. गेल्या तीन दिवसातील सोने आणि चांदीचे भाव पाहिले तर ते सातत्याने कमी होताना दिसत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ धोरण जाहीर केले आहे. त्याचा फटका जगभरातील अनेक देशांना बसत असल्याचे चित्र आहे. जगात मंदीचे सावट असल्याने सोन्याच्या भावावर बी त्याचा परिणाम झाल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्याचे भाव कमी होत असल्याने जळगाव सुवर्णनगरीत सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. खास करून महिला वर्गाने सोने खरेदीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसते.
सध्याच्या स्थिती गुंतवणूक करायची असेल तर ती सोन्यात करा असं तज्ज्ञांचं मत होतं. शिवाय सोन्याचा प्रती तोळा भाव एक लाखावर जाईल शिवाय, सोन्याच्या भावात सतत वाढ होत राहील असा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला होता. सोन्याचे वाढणारे भाव लक्षात घेता अचानक भाव घसरले आहेत. त्यामुळे भविष्यात परत भाव वाढण्या आधीच सोने खरेदी करण्याची लगबग सध्या सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये दिसत आहे.