
रेवती हिंगवे, पुणे:
Pune Tanisha Bhise Death Case: पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दोन जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून मंगेशकर रुग्णालयाने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध केला जात आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती ज्याचा अहवाल आता समोर आला आहे, हा अहवाल राज्य शासन तसेच महिला आयोगाकडे दिला जाणार आहे. याबाबतच आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
"घटनेदिवशी 28 तारखेला पेशंट नऊ वाजता पोहोचला होता त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी पेशंटला बोलावले तपासणी केले तसेच इतर डॉक्टरांना ऑपरेशन करण्याबाबत सूचना दिल्या. त्यापद्धतीने स्टाफने तयारी केली.मात्र पेशंटला ऑपरेशनला न्यायच्या आधी त्यांनी दहा लाखांची मागणी केली. हा सगळा प्रकार पेशंटच्या समोरच घडत होता. पेशंटच्या नातेवाईकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती मात्र याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. या सगळ्यात साडे पाच तास पेशंटवर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
तसेच "रुग्णालयाने पेशंटला तुमच्याकडेच असलेली औषधे घ्या असाही सल्ला दिला. त्यानंतर अडीच वाजता पेशंटला ससून रुग्णालयात घेण्याचा निर्णय घेतला. ससूनमधून 15 मिनीटात बाहेर पडले. त्यानंतर ते सूर्या हॉस्पिटलमध्ये गेले तिथे त्यांच्यावर योग्य उपचार झाले. दुसऱ्यादिवशी डिलीव्हरी झाली मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने पेशंटचा मृत्यू झाला. ऑपरेशनला जाण्यापूर्वी इतकी मोठी रक्कम मागितल्यामुळेच पेशंटची मानसिकता खचली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही चाकणकर यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल:
1) आपत्कालीन उपचार व संदर्भ सेवेचा अभाव:
रुग्ण गंभीर स्थितीत असूनही रुग्णालयाने कोणतेही प्राथमिक जीवित रक्षण उपचार (Emergency Life-Saving Treatment) न करता, तिला तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात संदर्भित केले नाही. यामुळे महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 मधील आपत्कालीन सेवेच्या तरतुदींचा भंग झाला आहे.
2) धर्मादाय योजनेअंतर्गत उपचार न देणे:
रुग्ण पात्र असूनही, तिला धर्मादाय योजनेअंतर्गत भरती करून उपचार करण्यात आले नाहीत. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट, 1950 अंतर्गत स्कीम नंबर 3 नुसार आपत्कालीन रुग्णांना तत्काळ उपचार व जीवनरक्षण सेवा मोफत/सवलतीने द्यावी लागते, परंतु तसे न केल्याचे दिसून आले आहे.
3) समुपदेशन व माहिती देण्यात गंभीर त्रुटी:
रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी धर्मादाय योजनेची माहिती, खर्चाचे विवरण व सल्ला न देता, समुपदेशनाच्या कर्तव्यात दुर्लक्ष केले.
दरम्यान, संबंधित मृत्यूचा माता मृत्यू अन्वेषण समितीकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांचाही अहवाल येणार आहे. शासनाच्या या अहवालानुसार तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे. उद्या तिन्ही समितींचे एकत्रित अहवाल सादर करण्यात येतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world