मंगेश जोशी, प्रतिनिधी
Gold Silver Rates Drop after Diwali : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात होणारी तेजी आता स्थिरावली असून लक्ष्मीपूजनानंतर 4 दिवसात सोन्याच्या भावात 8 हजारांची तर चांदीच्या भावात 22 हजारांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव जीएसटीविना 1 लाख 23 हजार रुपयांवर आले असून जीएसटी विना चांदीचे भाव 1 लाख 52 हजारांवर स्थिरावले (Gold silver rate today) आहे. दिवाळीत सोनं चांदी खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीसह राज्यभरात सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यभरात दिवाळीच्या 8 दिवसात सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल झाली. जागतिक स्तरावर Heavy profit booking झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचा अंदाज जळगाव सुवर्णनगरीतील सराफा व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी व्यक्त केला असून हेवी प्रॉफिट बुकिंगमुळे ऑक्टोबर महिन्यातील अखेरचा आठवड्यात सोन्या चांदीचे भाव काही प्रमाणात स्थिर राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
दिवाळीत 400 टन पेक्षा अधिक सोन्याची विक्री
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे तसेच इस्रायल - हमास व रशिया - युक्रेन या देशातील युद्धजन्य परिस्थिती तसेच फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर यामुळे डॉलरच्या तुलनेत जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाल्याने परिणामी सोन्याचे भाव वर्षभरात 47% तर चांदीचे भाव 80% टक्क्यांनी वाढले. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं हे उत्तम पर्याय असल्याने गुंतवणुकदारांचा ओढा हा सोन्याच्या गुंतवणुकीकडे राहिला. भारतीय बाजारपेठेतही गुंतवणुकदारांनी सोन्यासह चांदीच्या गुंतवणुकीलाही मोठे प्राधान्य दिले. 2026 च्या अखेरीस सोन्याचे भाव हे सव्वा लाखाच्या तर चांदीचे भाव हे दीड लाखांच्यावर पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला. होता मात्र त्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावाने हे दोन्हीही टप्पे पार केले. पुढील काळात सोन्या-चांदीचे भाव अजूनही वाढण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसह गुंतवणुकदारांनी सोन्या-चांदीच्या खरेदीला मोठं प्राधान्य दिलं असून परिणामी दिवाळी सणात राज्यभरात ग्राहकांनी विक्रमी सोन्या-चांदीची खरेदी केली आहे. तज्ज्ञांच्या मते दिवाळीमध्ये राज्यात सुमारे 400 टन पेक्षा अधिक सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज असून दीड हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल ही सराफा बाजारात झाल्याचाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोन्याचे भाव दोन लाख रुपयांपर्यंत जाणार?
आंतरराष्ट्रीय घडामोडी या काही प्रमाणात स्थिरावल्या असल्याने आणि मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झाल्याने सोन्याचे भाव काही प्रमाणात स्थिरावले आहेत. मात्र ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नसून जोपर्यंत आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि युद्धजन्य परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येणार नाही तोपर्यंत जागतिक पातळीवर सोन्याची गुंतवणूक ही सुरूच राहणार असल्याचे मत अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवले आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सोन्या चांदीच्या दरात होणारी वाट पाहता 2026 च्या सुरुवातीला सोन्याचे भाव 1 लाख 75 हजारापर्यंत तर 2026 च्या अखेरीस सोन्याचे भाव 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज जळगाव सुवर्णनगरीतील सोने तज्ज्ञ स्वरूप लुंकड यांनी वर्तवला आहे. तर सोबतच चांदीचे भावही हे 2026 च्या अखेरपर्यंत 2.50 लाखांच्यावर पोहोचण्याचा अंदाजही स्वरूप लुंकड यांनी व्यक्त केला आहे.