मंगेश जोशी
Gold Silver Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरांनी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या भावात ₹3,500 रुपयांची, तर चांदीच्या भावात तब्बल ₹6,000 रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे, तर सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे.
नक्की वाचा: 1 सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम! GST, LPG आणि चांदीच्या नियमांमध्ये मोठे बदल; वाचा नवे नियम
सोने आणि चांदीचा आजचा भाव किती आहे ?
जळगाव येथील सुवर्णनगरीत, सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ₹1,03,500 प्रति तोळा इतका झाला असून, जीएसटीसह सोन्याचा भाव ₹1,06,605 वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा भाव जीएसटीशिवाय ₹1,21,000 प्रति किलो झाला असून, जीएसटीसह त्याचा भाव ₹1,24,630 पर्यंत वाढला आहे. ही वाढ केवळ देशांतर्गत नसून, जागतिक पातळीवरील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमुळे झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले आहे.
नक्की वाचा: सुंदर दिसणं स्वस्त होणार? जीएसटी बदलांचा सर्वसामान्यांना होणार फायदा
जागतिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ
या भाववाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धजन्य स्थिती, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ (आयात शुल्क) बाबतची भूमिका आणि अमेरिकेतील फेडरल बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता, या प्रमुख कारणांमुळे सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे. परिणामी, जागतिक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करत आहेत. सोन्याची मागणी वाढल्याने आणि पुरवठा स्थिर असल्याने नैसर्गिकपणे सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. ही भाववाढ तात्पुरती नसून, जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत हे दर असेच वाढण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नागपुरात सोन्या-चांदीचा दर किती आहे?
30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.31 वाजता जीजेसी (GJC) आणि नागपूर सराफा बाजाराने जाहीर केलेल्या दरांनुसार, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येत असून, शनिवारी सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक नोंदवला आहे.
नवीन दरांनुसार, 99.5 शुद्धतेच्या स्टँडर्ड सोन्याचा विक्रीचा दर 1,03,900 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे, तर खरेदीचा दर 1,02,900 रुपये इतका आहे. तसेच, 22K (916) शुद्धतेच्या सोन्याचा विक्रीचा दर 96,600 रुपये आणि खरेदीचा दर 94,600 रुपये इतका आहे. 18K (750) शुद्धतेचे सोने 81,000 रुपये प्रति तोळा दराने विकले जात असून, खरेदीचा दर 79,000 रुपये आहे. 14K (583) शुद्धतेसाठी विक्रीचा दर 67,500 रुपये तर खरेदीचा दर 65,500 रुपये आहे.
चांदीच्या दरानेही मोठी झेप घेतली असून, आजचा विक्रीचा दर प्रति किलो 1,21,500 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. प्लॅटिनमच्या दरात कोणताही बदल झालेला नसून, तो प्रति ग्रॅम 48,000 रुपयांवर स्थिर आहे. या दरांवर मेकिंग चार्जेस, हॉलमार्क चार्जेस आणि जीएसटी (GST) वेगळे लागतील. मेकिंग चार्जेस किमान 13% किंवा त्याहून अधिक असू शकतात, असे व्यावसायिकांनी सांगितले आहे.