HSRP Number Plate : अवघे काही तास शिल्लक; HSRP नंबर प्लेटसाठी सरकारकडून अंतिम मुदत, अन्यथा अनेक सेवा रखडणार

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

HSRP Number plate : केंद्र सरकारकडून २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी एक विशेष सुरक्षित वाहन नंबर प्लेट बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नंबर प्लेटवर सुरक्षेसाठी १०-अंकी युनिक लेझर कोड आणि क्रोमियम होलोग्राम असतो. जुन्या वाहनांसाठी ही प्लेट बसवणे बंधनकारक आहे. साधारण वर्षभरापूर्वी याबाबत सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहे. ज्यांनी अद्याप आपल्या वाहनाची नंबर प्लेट अपडेट करून घेतली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाईचे संकेत...

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.

Advertisement

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. दरम्यान, ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.

नक्की वाचा - Tata iCNG Vs Maruti S CNG: टाटाच्या CNG कारचं मायलेज मारुतीहून कमी का असतं? मुद्द्यांनी समजून घ्या नेमकं कारणं

३० जूनपूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्या...

राज्यात एचएसआरपी बसविण्याच्या कामासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले असून, झोन १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ साठी एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृत दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारण्यात येणार आहेत.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article