मुंबई: GST नोंदणी संबंधित माहिती चोरली जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सदर प्रकरणात उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दानवे यांनी ही मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दानवे यांनी म्हटले आहे की, जीएसटीसाठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर विविध बँकांकडून सदर कंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी फोन येण्यास सुरूवात होते. जीएसटी विभागात नोंदणी झाल्याचे या बँकांना कसे कळते ? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहिती काही अधिकारी व कर्मचारी तृतीय पक्षांना देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वस्तू व सेवा कर अधिनियम व संबंधित नियमांनुसार करदात्याची माहिती अत्यंत गोपनीय असून ही माहिती कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या लोकांना गेणे, ही बाब कायद्याचा भंग करणारी आहे असे दानवे यांनी म्हटले आहे. या प्रकरणामध्ये करदात्याची माहिती बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचल्याचे दिसत असून विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून माहितीची बेकायदेशीर विक्री किंवा गळती होत असल्याचा संशयही दानवे यांनी व्यक्त केला आहे. ही माहिती लीक झाल्याने निष्पक्ष व्यावसायिक स्पर्धेवरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
माहिती गळती प्रकरण हे गंभीर असून यामुळे शासन आणि कर प्रशासन यांच्याबाबत करदात्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.