Sangli Hill Station : ना गर्दी ना गोंधळ, सांगलीतील सिक्रेट निसर्गरम्य ठिकाण पाहाल तर महाबळेश्वर-पाचगणी विसराल!

gudhe panchgani pathar : सध्या सर्वच पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झालेली असताना सांगलीतील हे ठिकाणं तुमची इच्छा पूर्ण करू शकेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

gudhe panchgani pathar : सध्या राज्यातील अनेक भागात निसर्गाने सौंदर्याची जणू उधळणच केली आहे. मग महाबळेश्वर, भंडारदरा, पाचगणी असो की लोणावळा. कोकणात तर ठिकठिकाणी नद्या-ओढे वाहताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गड-किल्ल्यांवरही निसर्गाचे रुप न्याहाळण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे एकांतात, गोंधळाशिवाय निसर्गाचं आनंद घेणं दूरापास्त झालं आहे. 

अशावेळी सांगलीतील हे ठिकाणं तुमची इच्छा पूर्ण करू शकेल. चांदोली परिसरातील सृष्टीचं लावण्य म्हणजे गुढे-पाचगणी पठार. बऱ्याच पर्यटकांचा या पठाराकडे ओढा असतो. सांगलीच्या चांदोलीवर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. येथे खुललेलं सृष्टीचं  बारमाही सौंदर्य पर्यटकांना आकर्षित केल्यावाचून राहत नाही. तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेले हे पठार उंच ठिकाणांपैकी एक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतच असणार्‍या निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुढे-पाचगणी पठारावर सध्या हिरवी वनराई बहरली आहे.पर्यटकांना ती साद घालत आहे.

नक्की वाचा - Pune - Lonavala tour: एसी बसने लोणावळा टूर, तिकीट फक्त 500 रुपये; पटकन करा प्लॅनिंग

उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वत रांगा, उंचावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे, नागमोडी वळणे घेत पठारावर पोहोचणारी वाट, चारी बाजूला हिरवा गर्द निसर्ग, वारंवार आकाशातून खाली उतरणारे ढग, त्यातून फिरत असणारी पवनचक्की, सतत वाहणारा मंद वारा, अल्हादायक वातावरणातून मनाला मिळणारा गारवा... सृष्टीचा हा सगळा नजराणा पर्यटकांच्या मनाला हर्षित केल्यापासून राहत नाही. सध्या मिनी महाबळेश्वर म्हणून गुढे पाचगणीची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे. नजर फिरेल तिकडे हिरवाईने नटलेली विलोभनीय दृश्यं पाहताना मन अचंबित होत आहे .