साताऱ्यातील साखर गाठी परदेशात वाढवताहेत सणांचा गोडवा, माळा तयार करण्याची जाणून घ्या प्रक्रिया 

Gudi Padwa 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणासमारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या साखर गाठीच्या माळा कशा पद्धतीने तयार केल्या जातात? जाणून घ्या स्पेशल रिपोर्ट

जाहिरात
Read Time: 2 mins

- सुजीत आंबेकर, प्रतिनिधी, सातारा
Gudi Padwa 2024:
गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्ष. हिंदू पंचांगनुसार घरासमोर गुढी उभारून नवीन वर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत केले जाते. गुढी उभारण्यापूर्वी गुढीच्या काठीला स्नान घालून आंब्याच्या पानांचा तसेच फुलांची माळ अर्पण करून व वस्त्र बांधून सजावट केली जाते. पूजेच्या साहित्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे साखर गाठीच्या माळा. 

या माळांशिवाय गुढीपाडव्याची पूजा पूर्णच होऊ शकत नाही, कारण तशी परंपराच आहे. सौभाग्याची, सन्मानाची व आरोग्याची गुढी उभारू असे म्हणते आपण मुख्य प्रवेशद्वारासमोर गुढी उभारतो. बदलत्या काळानुसार आता बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साखर गाठीच्या माळा उपलब्ध होऊ लागल्या आहेत.  आपल्या राज्यातील सातारा जिल्हा साखर गाठीच्या माळेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

येथे साखर गाठीचे बरेच कारखाने आहेत. शेखर राऊत यांचा देखील साखर गाठीच्या माळांचा कारखाना आहे.  राऊत मिठाई असे त्यांच्या दुकानाचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे साखर गाठ्या तयार करण्याचा राऊत कुटुंबीयांचा व्यवसाय हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सुरू आहे. आता त्यांची चौथी पिढी देखील हाच व्यवसाय करत आहे.  

साताऱ्यातील साखर गाठीच्या माळांना परदेशातही मागणी

शेखर राऊत यांच्या कारखान्यामध्ये तयार झालेल्या साखर गाठींना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरवर्षी साताऱ्यातून न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, अबुधाबी यासह अन्य देशांमध्ये साखर गाठी मागणीनुसार पाठवल्या जातात. अशा पद्धतीने परदेशातील मराठी बांधव साताऱ्यातील साखर गाठींचाच गुढीपाडव्याच्या पूजेमध्ये समावेश करतात.  

Advertisement

साखर गाठीच्या माळा दिसायला जितक्या सुंदर, नाजूक व आकर्षक असतात. तितकेच त्या तयार करण्याची प्रक्रिया कठीण असते. यातही मोठी अडचण म्हणजे कारखान्यामध्ये काम करण्यासाठी सध्या कुशल व तरुण कामगार मिळत नाहीत.  

(Gudi Padwa 2024 Date: गुढी उभारणीचा शुभ मुहूर्त व पूजेची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर)

कशा तयार केल्या जातात साखर गाठी?

साखर गाठीच्या माळा तयार करण्यासाठी एका कारखान्यामध्ये सुमारे 15 कामगार असतात. यासाठी साखर, लिंबू, दूध सरकारमान्य खाद्य रंग, दोरा, लाकडी साच्याचा वापर केला जातो. पाक तयार झाल्यानंतर साच्यामध्ये ओतून गाठी तयार केल्या जातात. साखर गाठीचेही विविध प्रकार आहेत. अगदी 50 ग्रॅमपासून ते पाच किलोपर्यंत बाजारामध्ये मिळणाऱ्या साखर गाठींची 15 रुपयांपासून 850 रुपयांपर्यंत इतक्या किंमतीत विक्री केली जाते. 

Advertisement

(Happy Gudi Padwa: नातेवाईक-मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याचे हे शुभेच्छा संदेश पाठवून साजरा करा सण)

वेगवेगळ्या आकारातील आकर्षक साखर गाठीच्या माळा

पारंपरिक आकाराव्यतिरिक्त साखर गाठी गोल, चौकोनी, पाने-फुले-फळांच्या आकारामध्ये तसेच बिस्किटाच्या आकारातही उपलब्ध असतात. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत या माळांचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त ग्रामदैवतांना नैवेद्य दाखवताना तसेच नवीन वाहनाच्या पूजेसाठीही साखर गाठीच्या माळांचा हमखास समावेश केला जातो.  

(Gudi Padwa 2024: गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा, नववर्षाचे जल्लोषात स्वागत)