जाहिरात

Gujarat Rain: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! गुजरातमध्ये धो-धो पाऊस; मुंबईकडे जाणाऱ्या 'या' गाड्या रद्द

Gujarat Rain Railway Update: गुजरात राज्य सध्या मुसळधार तडाख्यात सापडले आहे. निसर्गाच्या या कोपाचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे.

Gujarat Rain: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! गुजरातमध्ये धो-धो पाऊस; मुंबईकडे जाणाऱ्या 'या' गाड्या रद्द
Gujarat Rain : गुजरामध्ये सुरु असलेल्या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे.
नंदुरबार:

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Gujarat Rain Railway Update: गुजरात राज्य सध्या मुसळधार तडाख्यात सापडले आहे. निसर्गाच्या या कोपाचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून जळगाव-नंदुरबार मार्गाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्यंतरीच्या स्थानकांवरच गाड्या थांबवून रद्द करण्यात आल्यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

रेल्वे गाड्या अचानक रद्द, प्रवाशांचे नाहक हाल

गुजरातमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. जळगाव आणि नंदुरबार मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या प्रवासादरम्यानच वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या. 

अनेक प्रवाशांना पुढे जाण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने आणि अचानक गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने तासंतास स्थानकांवर ताटकळत राहावे लागले. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना मार्गदर्शन केले जात असले तरी ऐनवेळी झालेल्या या बदलांमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

( नक्की वाचा : Nashik News: नाशिकला महापूराचा धोका! दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पोहोचलं पाणी!'या' भागांमध्ये येणार पाणी )

कोणत्या गाड्या कुठे करण्यात आल्या रद्द?

गाडी क्रमांक 22972 पटना ते बांद्रा टर्मिनस ही सुपरफास्ट एक्सप्रेस पटनावरून सुटल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर स्थानकापर्यंतच चालवण्यात आली. त्यानंतर ही गाडी अमळनेर येथेच पूर्णपणे रद्द करण्यात आली.

गाडी क्रमांक 19004 भुसावळ ते बांद्रा खानदेश एक्सप्रेस ही गाडी केवळ भुसावळ ते नंदुरबार दरम्यानच धावणार आहे. नंदुरबार स्थानक आल्यानंतर ही गाडी पुढे बांद्राच्या दिशेने रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 15067 गोरखपूर ते बांद्रा टर्मिनस ही साप्ताहिक एक्सप्रेस नवापूर स्थानकापर्यंत धावली. तेथे ही गाडी रद्द घोषित करण्यात आली आणि त्यानंतर ही गाडी पुन्हा नंदुरबारच्या दिशेने मागे आणण्यात आली.

पावसाचा जोर कायम, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही काळ जाण्याची शक्यता आहे. अचानक रद्द झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन बदलण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असून आवश्यक असल्यास अधिकृत हेल्पलाइनवरून गाड्यांच्या वेळेची खात्री करूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com