Mumbai JNPT News: आखाती भुमित सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर उमटू लागला आहे. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे सुमारे १,१०० निर्यात कंटेनर अडकून पडले असून त्यामध्ये प्रामुख्याने कृषी मालाचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रातील व्यापारी आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
५,४०० टन कांदा बंदरात अडकला!
नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यात सर्वाधिक प्रभावित झाली आहे. परदेशात पाठवण्यासाठी तयार ठेवलेले सुमारे ५,४०० टन कांदे बंदरातच अडकले आहेत. मालाची शिपमेंट थांबल्याने निर्यातदारांचे व्यवहार ठप्प झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातही पूर्णपणे थांबली आहे. निर्यात बंद झाल्याने स्थानिक बाजारात दर कोसळले असून उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. द्राक्ष, पपई आणि इतर फळ उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत.
Mumbai ATS Raid: ब्रेकिंग! मुंबईत 4 ठिकाणी ATSची छापेमारी, चौघे ताब्यात; दहशतवादी कनेक्शनचा संशय
महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Dubai येथे परिस्थिती अधिक गंभीर आहे. आधीच पाठवलेले सुमारे ३७० कंटेनर दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः रमजानच्या पार्श्वभूमीवर पपई, कांदा, केळी, द्राक्ष यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. महाराष्ट्रासह देशातील २९ राज्यांमधून या बाजारपेठेत कृषी माल पाठवला जातो. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकरी आणि निर्यातदारांवर उभे संकट कोसळले आहे.
समुद्री मार्गांवरील अनिश्चितता, वाढलेले विमा प्रीमियम, मालवाहतूक दरातील वाढ आणि पेमेंट संदर्भातील अडचणी यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कांदा, मका, मिरची, टोमॅटो आणि डाळिंब यांच्या निर्यातीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. दरम्यान, आयात क्षेत्रातही परिणाम जाणवत आहे. इराणमधून येणाऱ्या पिस्ता आणि बदाम यांच्या दरात वाढ झाली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने सुकामेव्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दलालांकडून होतेय फसवणूक
दुसरीकडे, बासमती तांदळाच्या किमतीत देशांतर्गत बाजारात सुमारे १६ टक्क्यांची घट झाली आहे. या संकटकाळात काही दलालांकडून “माल क्लिअर करून देतो” किंवा “विशेष मार्गाने निर्यात सुरू करून देतो” अशा प्रकारच्या भूलथापा दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासन आणि निर्यात संघटनांनी व्यापारी व शेतकऱ्यांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- पुण्यात खळबळ! कोट्यवधींच्या 'डिजिटल अरेस्ट' स्कॅममध्ये प्रसिद्ध 'रील स्टार'चा हात; पोलिसांकडून शोध सुरू)
तज्ज्ञांच्या मते, गल्फमधील तणाव दीर्घकाळ कायम राहिल्यास महाराष्ट्राच्या निर्यात-आधारित कृषी अर्थव्यवस्थेला मोठा आणि दीर्घकालीन फटका बसू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने राजनैतिक पातळीवर हस्तक्षेप करून पर्यायी व्यापार मार्ग उपलब्ध करून द्यावेत तसेच शेतकरी व निर्यातदारांसाठी विशेष आर्थिक दिलासा पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.