जाहिरात

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा! शिक्षक दिनानिमित्त भाषणाने जिंका गुरूंचे मन

Happy Teacher's Day 2025: शिक्षक दिनानिमित्त भाषण करून तुम्हाला तुमच्या गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता येईल आणि त्यांचे मनही जिंकता येईल.  

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा! शिक्षक दिनानिमित्त भाषणाने जिंका गुरूंचे मन
मुंबई:

भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' (Teacher's Day 2025) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी खूप खास असतो. 5 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते आणि त्यामुळेच हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मातीच्या गोळ्याला भांडी घडविणारा जसा आकार देतो तसेच शिक्षक हे आपल्या जीवनाला आकार देत असतात. शिक्षक किंवा गुरू हा जीवनात दिशादर्शकाचे काम करत असतो त्यामुळे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असते. शिक्षकांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाच्या  दिवशी तुम्हाला भाषण (Teacher's Day Speech)  करायचे असेल तर भाषणाचे हे विषय आणि तपशील फायदेशीर ठरतील, शिक्षक दिनानिमित्त भाषण करून तुम्हाला तुमच्या गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता येईल आणि त्यांचे मनही जिंकता येईल.  

नक्की वाचा: शिक्षकांमुळे जीवनाला मिळाली दिशा, शिक्षक दिनानिमित्त गुरुंना पाठवा खास शुभेच्छा संदेश

देशभरातील शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करतात. अनेकदा विद्यार्थी भाषणातून आपल्या भावना व्यक्त करतात, पण काही विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे आव्हान असते. कोणत्या विषयावर बोलायचे, कसे बोलायचे आपले भाषण प्रभावी होईल की नाही अशा अनेक शंकांमुळे भाषण करायची भीती वाटत असते. अशा सगळ्यांसाठी भाषणाच्या या आयडिया फायद्याच्या ठरतील यात शंकाच नाही. ही भाषणे सर्व वयोगटातील व्यक्ती करू शकतील.  

शिक्षक नव्हे ज्ञानदीप

प्रत्येक शिक्षकाकडे शिकवण्याच्या अनोख्या पद्धती असतात, पण काही शिक्षक असतात जे अभ्यास सोप्या पद्धतीने करवून घेतात. काही शिक्षक असे असतात जे उदाहरणे देऊन धडे सोपे करून सांगतात. वैयक्तिक अनुभवातून मिळालेले ज्ञान ते विद्यार्थ्यांना अभ्यासी किंवा पुस्तकी ज्ञान सोप्या रितीने समजावे यासाठी प्रयत्नशील असतात.  आपल्या जीवन, समाज आणि देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. याच दिवशी भारताचे महान व्यक्तिमत्व, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. एक अभ्यासक, मुत्सद्दी, भारताचे राष्ट्रपती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. एकदा, 1962 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती असताना काही विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी ते म्हणाले की, 'माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी, शिक्षण क्षेत्रासाठी मी केलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा करू नये?' त्यांच्या या विनंतीनंतर, देशभरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Teachers Day

नक्की वाचा: शिक्षक दिनानिमित्त शाळेत करण्यासाठी प्रभावी भाषण, हे मुद्दे लक्षात ठेवा...सर्व करतील तुमचं कौतुक

शिक्षकांचे योगदान अमूल्य

शिक्षक दिन हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण शिक्षकांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करतो. शिक्षण हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे, कारण शिक्षकांवर फक्त शिकवण्याचीच नाही तर नवी पिढी घडवण्याची जबाबदारी असते. एका शिक्षकाच्या वर्गात अनेक विद्यार्थी असतात आणि प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या क्षमतेचा असतो, त्यामुळे त्यांचे काम अधिक आव्हानात्मक होते. काही विद्यार्थी खेळात उत्कृष्ट असतात, तर काही गणितात, तर काहींना इंग्रजीमध्ये आवड असते. एक चांगला शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेतो आणि त्यांच्यातील क्षमता ओळखतो. तो त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात किंवा कामात अधिक पारंगत बनवण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत कुठेही मागे पडणार नाही याची काळजी घेतो. त्यामुळेच हा दिवस शिक्षकांप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित केला गेला आहे.

तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Teachers Day


गुरू-शिष्याचे नाते हे जगावेगळे नाते

भारतात प्राचीन काळापासूनच गुरू-शिक्षक परंपरा चालत आली आहे. आपले आई-वडील हेच आपले पहिले गुरू असतात, कारण त्यांच्यामुळेच आपण हे जग पाहू शकलो, त्यामुळे त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण जगण्याचा योग्य मार्ग आपल्याला शिक्षकांकडून कळतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यश मिळवतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्तानेच शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा होतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामध्ये एका आदर्श शिक्षकासाठी गरजेचे असलेले सर्व गुण होते. जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे उप-राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा झाल्यास मला खूप अभिमान वाटेल.' त्यानंतर, दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.

तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Teachers Day

जीवनाचा खरा अर्थ सांगतो तोच खरा गुरू

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या शिक्षकाने घेतलेली मेहनत ही देखील अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षकाने दाखवलेल्या मार्गावर ती व्यक्ती मार्गक्रमण करते आणि प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालते. कोणत्याही व्यक्तीच्या यशामध्ये शिक्षकाची, गुरूची किंवा मार्गदर्शकाची भूमिका अनन्यसाधारण असते.  प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूला खूप महत्त्व असते. त्यांच्या याच मेहनतीला उजाळा देण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी शिक्षकांचा सन्मान केला जातो. या दिवशी शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. या दिवशी सरकारही सर्वोत्तम शिक्षकांना सन्मानित करून त्यांना पुरस्कार देते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त या दिवशी स्मरण केले जाते.

तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Teachers Day

शिक्षकांमुळे लाभतो संस्कार 

जीवनात कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहायचे असेल किंवा यश मिळवायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. जीवन संघर्षात शिक्षण हे अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे. आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिशेने पुढे घेऊन जायचे, हे शिक्षकाच्या हातात असते, जेणेकरून त्यांना यशस्वी जीवन मिळू शकेल. याचा अर्थ असा की, देशाचे हित साधणारे नागरिक तयार करण्याची आणि त्यांना योग्य गुण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. जेव्हा आपण जन्माला येतो, तेव्हापासून आपण नवनव्या गोष्टी शिकायला लागतो. आयुष्यभर आपण काहीना काहीतरी शिकतच असतो. त्यावेळी तो शिक्षकच असतो जो आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतो आणि  आपले जीवन यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न करत असतो. शिक्षक विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधून काढत त्यांना प्रोत्साहन देतात आणि अंधारमय जीवनाला प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. हे करताना ते आपला कोणताही स्वार्थ पाहत नाहीत. शिक्षकांमुळे आपल्यावर चांगले संस्कार घडतात जे आयुष्यभराची शिदोरी म्हणून आपल्यासोबत राहतात. शिक्षक प्रत्येक ठिकाणी निस्वार्थपणे मदतीसाठी तत्पर असतात.  आज असंख्य यशस्वी व्यक्तींच्या सफलतेमध्ये त्यांच्या शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा मोठा वाटा आहे.  

तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Teachers Day

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com