- राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Chhatrapati Shivaji Maharaj News: प्रसिद्ध कादंबरीकार आणि इतिहासकार विश्वास पाटील 'अस्मान भरारी' हे नवीन पुस्तक लिहिलंय. या पुस्तकामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित गोष्टींचे संशोधन करून त्याबाबतची माहिती छापलीय. आग्रा मोहीमेवरून शिवाजी महाराज राजगडावर कसे पोहोचले, या घटनेचाही त्यांनी पुस्तकात उल्लेख केलाय, जाणून घेऊया सविस्तर..
छत्रपती शिवाजी महाराज 27 दिवसांत राजगडावर कसे पोहोचले?
कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या मते, आग्रा मोहीमेनंतर शिवाजी महाराज प्रयागला गेले. तिथून बघेलखंड, बुंदलेखंडकडून अमरकंटकला गेले. तेथून बस्तरहून मेढकजवळ पोहोचले. झारखंडमध्ये डाल्टनगंज नावाचं ठिकाण होतं, पूर्वापार त्याचं नाम पलामू होतं. पलामूच्या राजाने महाराजांना मोठी मदत केली. तो आदिवासींचा राजा होता. हे राज्य औरंगजेबविरोधी होते, याबाबतची माहिती महाराजांना पूर्वीच होती म्हणून ते बरोबर त्याच ठिकाणी पोहोचले. मेदिनीनगरमध्ये एक मैदान आहे, त्याचं नाव शिवाजी मैदान ठेवण्यात आलंय. 200-300 वर्षापासून मैदानास हेच नाव आहे. औरंगजेबचे जे चार-पाच मोठी इतिहासकार आहे, ज्यांनी त्या काळामध्ये 400-500 पानं लिहून ठेवलेली आहेत, त्या सर्वांनी एकजात या झारखंडच्याच बाजूने शिवाजी महाराज दक्षिणेकडे गेले, असे लिहून ठेवलंय. 91 कलमी बखरीतही हीच माहिती आहे. दोन लाखांची फौज शिवाजी महाराजांच्या शोधासाठी बाहेर पडली होती. औरंगजेबकडे एकूण साडेदहा लाखांची फौज होती. त्यामुळे महाराजांनी जाणीवपूर्वक अत्यंत हुशारीने असा रस्ता निवडला.
शिवाजी महाराजांसारखा दिसणारा तो व्यक्ती कोण?
विश्वास पाटील पुढे असंही म्हणाले आहेत की, महाराज प्रयागराज, हैदराबादमार्गे, पंढरपूरवरून राजगडावर पोहोचले. महाराज 28-30 दिवसानंतर राजगडावर पोहोचले हे बरोबर वाटत नाही. 18 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या तारखा बरोबर वाटतात. मिराजी रावजी हे महाराजांसारखे दिसायला सुंदर होते. त्यांना अनेक भाषा यायच्या. ते महाराजांसोबत राजगडावर आले. ते गोसाव्याच्या रुपात आले होते, राजगडावर आल्यानंतर त्यांनी कीर्तन केलं, ते ऐकून कोण इतकं गोड गळ्याचा माणूस गातोय, हे पाहण्यासाठी जिजाऊसाहेब बाहेर आल्या. कीर्तन ऐकून त्या शिवाजी महाराजांच्या पाया पडायला जाणार इतक्यात महाजारांनी त्यांना अडवले.
औरंगजेबला शिकारीचा नाद होता. 23 जुलैला पाच दिवसांसाठी शिकारीला गेला होता. त्या पाच दिवसांत शिवाजी महाराजांना परमानंद स्वामी भेटायला आले होते. लेखणीसह शस्त्रामध्येही ते तरबेज होते. हिंदुस्थानभर त्यांचे जाळं पसरलेलं होते, साधू-बैरागींचे हे नेटवर्किंग होतं. साधूबैरागी महाराजांना मार्ग दाखवण्याचे काम करायचे.
महाराज औरंगजेबजवळ गेले तेव्हा रामसिंह ओरडला 'कुर्निश', 'कुर्निश' म्हणजे दंडवत घालायचं, जीभेने जमीन चाटायचं आणि बादशाहला मुजरा करायचा. महाराजांनी पर्वा केली नाही, त्यापेक्षा मरण पत्करेन म्हणाले. औरंगजेब हे पाहत होता. मिर्झाराजे जयसिंहसारखी लोक औरंगजेबासमोर दिवसाला पाचवेळा कुर्निश करायचे. कुर्निश करण्यावरून महाराज भडकले होते, तो ट्रिगर पॉइँट ठरला, अशीही माहिती विश्वास पाटील यांनी NDTV मराठीशी बातचित करताना दिलीय.
संपूर्ण मुलाखत ऐका :