Tukaram Mundhe Struggule Story: महाराष्ट्राचे धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सध्या एफडीएमधील त्यांच्या बेधडक कारवाया अन् शिस्तबद्ध कारभाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतेच तुकाराम मुंढे यांच्यावरील शफी पठाण यांनी लिहलेल्या "तुकाराम" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. न्यू ईरा पब्लिकेशन आणि सरहद पुणेच्या वतीने आयोजित या प्रकाशन सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांचे ज्येष्ठ बंधू आणि महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अशोक मुंढे यांनी तुकाराम मुंढेंचा संघर्ष मांडला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनीही तुकाराम मुंढेंच्या कारभाराचे कौतुक करत त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मांडले. यावेळी बोलताना मान्यवरांनी तुकाराम मुंंढेंच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मांडले. बालपणी तिनवेळा तुकाराम मुंढेंवर मोठी संकटे आली, सुदैवाने त्यावरही मात करुन तुकाराम मुंढें कसे मृत्यूच्या दारातून परतले? याची थरारक कथा ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी सांगितले.
3 वेळा मृत्यूला हुलकावणी, तुकाराम मुंढेंच्या आयुष्यातील थरारक प्रसंग!
नियतीने तुकाराम मुंढेंना काहीतरी चांगले करण्यासाठीच निवडले होते म्हणूनच तीन वेळा त्यांनी मृत्यूला चकवा दिला. तुकाराम मुंढे अवघ्या वयाच्या ७ महिन्याचे असताना त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. एकेदिवशी ते रांगत रांगत बारा फूट उंच गच्चीवरुन खाली पडले. इतक्या मोठ्या उंचीवरुन पडल्याने त्यांना मोठा मार लागला, ते निपचित पडले. त्यांचे संपूर्ण अंग रक्ताने माखले होते, कानातून रक्त वाहत होते. अगदी त्यांच्या जीवावर बेतणारा असा तो प्रसंग होता. पण सुदैवाने या संकटातून तुकाराम मुंढे बचावले.
त्यानंतर बालपणी तुकाराम मुंढे यांना पोलिओचा दुर्गम आजार जडला होता. त्यावरही त्यांनी मात केली, ठणठणीत बरे झाले. तुकाराम मुंढेंच्या आयुष्यातील तिसरा प्रसंग म्हणजे त्यांना पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होत होता. त्यावेळीही त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता पण म्हणतात ना दैव तारी त्याला कोण मारी या आजारातूनही तुकाराम मुंढे बरे झाले..!