FDA Tukaram Mundhe News: तुम्ही पुण्यात रहात असाल अन् हॉटेलमधील चमचमीत खाण्याचे शौकिन असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील अस्वच्छ खाद्यपदार्थांबाबत अत्यंत गंभीर माहिती दिली आहे. 'एमसीसीआयए' (MCCIA) आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना तुकाराम मुंढे यांनी एफडीएकडे येणाऱ्या तक्रारींबाबत गंभीर इशारा दिला ज्याने पुणेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, तुकाराम मुंढेंनी काय सांगितलं?
पुणे शहरात बाहेरचे खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे. राज्यात भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांविरोधात सर्वाधिक तक्रारी एकट्या पुणे शहरातून दाखल झाल्या आहेत, असा खुलासा अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. 'एमसीसीआयए' (MCCIA) आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही गंभीर बाब अधोरेखित केली.
मुंढे यांनी सांगितले की, एफडीएने सुरू केलेल्या विशेष डॅशबोर्डवर राज्यभरातून तक्रारी येत आहेत, मात्र त्यात पुणेकर आघाडीवर आहेत. प्रामुख्याने हॉटेल्समधील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारींचा ओघ वाढवला आहे. आरोग्यावर भाष्य करताना ते म्हणाले, "देशात मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण ३० टक्क्यांवरून ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. याला आपण खात असलेले अन्न जबाबदार आहे. त्यामुळे वस्तू विकत घेताना केवळ 'एक्सपायरी डेट' न पाहता त्यातील अन्नघटकांची तपासणी करणे गरजेचे आहे."
अन्न सुरक्षेबाबत कठोर धोरण अवलंबत असल्याचे सांगत मुंढे यांनी स्पष्ट केले की, तक्रारींवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचेल, अशी डिजिटल यंत्रणा उभारली आहे. भविष्यात भेसळखोरांवर वचक बसवण्यासाठी 'एआय' (AI) आणि 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकांपासून ते वितरकांपर्यंत सर्वांवर नजर ठेवली जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world