Tukaram Mundhe : २१ वर्षात २४ वेळा बदली झालेले महाराष्ट्रातील दबंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तुकाराम मुंढे यांना मोठा धक्का बसला. आईच्या निधनाने भावुक झालेल्या तुकाराम मुंढेंनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
आईच्या निधनानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचं दहावं आणि तेरावं न करता विवेकवादी पद्धतीने आईवर अंत्यसंस्कार केले. त्यांनी आईच्या अस्थी नदीत विसर्जित न करता शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या. आईची माया झाडाच्या सावलीच्या रुपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहोत अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
तुकाराम मुंढेंची विचारपूर्वक वाट...
तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय....
नमस्कार,
आमच्या “बाईंच्या” (आईच्या) स्मृतीप्रत्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा , संवेदनशील व विवेकवादी निर्णय मुंढे परिवारातर्फे घेतला आहे. “निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे.”
या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे, जेणेकरून आमच्या “बाईंची” माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. हा वटवृक्ष आमच्या बाईंच्या मायेची सावली आणि “जीजींचे” आशीर्वाद बनून पिढ्यानपिढ्या बहरत राहील.
(आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला “बाई” म्हणून संबोधित असू, तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या “जीजी” होत्या.)
तसेच, आम्ही कोणत्याही प्रकारचा दहावा किंवा तेरवा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून, सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल असे आम्हाला वाटते. आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि “बाईंच्या” आठवणी आपल्या हृदयात कायम जपून ठेवाल, हीच नम्र अपेक्षा.