सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर
Marathwada Rain News: मराठवाड्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून, जोरदार पाऊस झाला आहे. तर दिवसाच्या वेळी तापमानात वाढ होत असल्यामुळे उकाडा देखील वाढला आहे. आता हवामान विभागाने मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
या अंदाजानुसार, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या चार जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मराठी व्यक्तीला मारहाण; महाराष्ट्र एकीकरण समितीचा गंभीर इशारा)
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहणार आहे. पुढील 24 तासांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातही अशीच स्थिती राहणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा नाही.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदत; या दिवशी होणार पैसे जमा)
या अनियमित हवामानामुळे शेती कामांवर परिणाम होत असून, शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवस काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.