जाहिरात

Pune News: स्पेनमधून बेपत्ता झालेल्या कॅप्टन शरीफ भोसलेंवर होणार मोठी कारवाई

Special Forces Captain Sharyfsinh Bhonsle: कॅप्टन भोसले हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) माजी विद्यार्थी असून 2009 मध्ये त्यांची नियुक्ती लष्कराच्या अत्यंत मानाच्या '2 पॅराशूट रेजिमेंट' (स्पेशल फोर्सेस) मध्ये झाली होती.

Pune News: स्पेनमधून बेपत्ता झालेल्या कॅप्टन शरीफ भोसलेंवर होणार मोठी कारवाई
Who is Captain Sharyfsinh Bhonsle: 2014 पासून कॅप्टन भोसले बेपत्ता झाले होते.
पुणे:

पुण्यातील औंध भागातील रहिवासी आणि भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसचे अधिकारी कॅप्टन शरीफसिंह भोसले यांच्यावर अखेर लष्कराने बडतर्फीची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या आणि फरार घोषित करण्यात आलेल्या भोसले यांना लष्कराने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून, त्यांची सेवा का समाप्त करू नये, अशी विचारणा केली आहे.

नक्की वाचा: दिवसा ऑफिसमध्ये ड्यूटी, रात्री पुस्तकांशी मैत्री; 3 वेळा अपयशी, मग अशी झाली IFS अधिकारी

कोण आहेत कॅप्टन शरीफसिंह भोसले?

कॅप्टन भोसले हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) माजी विद्यार्थी असून 2009 मध्ये त्यांची नियुक्ती लष्कराच्या अत्यंत मानाच्या '2 पॅराशूट रेजिमेंट' (स्पेशल फोर्सेस) मध्ये झाली होती. ज्यावेळी ते बेपत्ता झाले, त्यावेळी ते अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांचे एडीसी होते.

कॅप्टन शरीफसिंह भोसलेंसोबत काय घडले ?

लष्कराच्या अधिकृत नोटीसनुसार, ऑगस्ट 2014 मध्ये वार्षिक रजा संपल्यानंतर कॅप्टन भोसले कामावर रुजू झाले नाहीत. तपास केला असता असे दिसून आले की, लष्करी गुप्तचर विभागाची (MI) कोणतीही परवानगी न घेता ते आंतरराष्ट्रीय पॅरा-जंपिंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी स्पेनला गेले होते. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे शेवटचे लोकेशन नॉर्वे असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

नक्की वाचा: 12 वी नापास, सायकलवर दूधविक्री!, जिद्दीच्या जोरावर नाशिकच्या लेकाने दिल्ली गाजवली

कठोर कारवाईचा इशारा

कॅप्टन भोसले यांना पकडण्यासाठी 2016 मध्ये आदेश जारी करण्यात आला होता, मात्र त्यांचा शोध लागू शकला नव्हता. लष्करप्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, दीर्घकाळ अनधिकृतपणे गैरहजर राहणे हे 'गंभीर गैरवर्तन' असल्याचे म्हटले आहे. अशा अधिकाऱ्याला सेवेत ठेवणे अयोग्य असल्याचे आता लष्कराने स्पष्ट केले आहे. यामुळे कॅप्टन भोसले  यांच्या पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी 27 ऑक्टोबर 2025 रोजीची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर या कालावधीत कोणतेही उत्तर मिळाले नाही, तर लष्कर कोणाचीही वाट न पाहता (Ex-parte) त्यांना सैन्य दलातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल असे सांगण्यात आले आहे. पुणेकर न्यूज या पोर्टलवर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com