प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
देशातील प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट ओळख मिळावी आणि सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने केंद्र सरकारने आधार कार्ड योजना सुरू केली. 29 सप्टेंबर 'आधार कार्ड दिवस' साजरा होत असताना, या ऐतिहासिक योजनेच्या पहिल्या लाभार्थी महिलेच्या जीवनात मात्र आजही संघर्ष कायम आहे. 2010 साली, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या टेंभली या एका छोट्याशा पाड्यावर राहणाऱ्या रंजनाताई सदाशिव सोनवणे या देशातील पहिल्या आधार कार्ड धारक ठरल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे कार्ड प्रदान करण्यात आले होते. मात्र, या घटनेला 15 वर्षांहून अधिक काळ उलटूनही, देशातील या पहिल्या आधार कार्ड लाभार्थी महिलेच्या परिस्थितीत आजही कोणताही लक्षणीय बदल झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
एका मोठ्या सरकारी योजनेचा 'चेहरा' बनूनही, आज रंजनाताई सोनवणे यांना 'आधार कार्ड तर भेटले, पण आधार भेटले नाही' अशी भावना व्यक्त करावी लागत आहे. त्यांच्या या शब्दांत सरकारी योजनांच्या अंमलबजावणुकीतील त्रुटी आणि सामान्यांचे आजही सुरू असलेले दुर्लक्षित जीवन अधोरेखित होते.
(नक्की वाचा- Solapur Flood: फोन केला, फजिती झाली! पूरग्रस्तांसमोरच कलेक्टरने शिंदे गटाच्या नेत्याला झापलं, पाहा VIDEO)
आधार कार्ड हे सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. असे असतानाही, देशातील पहिल्या लाभार्थी असलेल्या रंजनाताईंना आजही त्यांच्या स्वतःच्या नावावर घरकुल मिळालेले नाही. त्यांना मिळालेले घरकुल मुलांच्या नावावर आहे. आजवर अनेक सरकारी योजना आल्या आणि गेल्या, पण त्यातील कोणतीही योजना रंजनाताईंच्या जीवनात 'आधार' देऊ शकली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
रंजनाताईंनी अत्यंत कष्ट करून आपल्या मुलांना मोठे केले, त्यांना शिक्षण दिले. आपल्या कुटुंबाला दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, आजही त्यांच्या मुलांना नोकरी मिळालेली नाही. बेरोजगारी आजही त्यांच्या कुटुंबासमोर एक मोठे आव्हान म्हणून उभी आहे. मुलांना चांगले शिक्षण देऊनही नोकरी नसल्यामुळे, रंजनाताई सोनवणे आजही शेतात मजुरीचे काम करून आपल्या घराचा गाडा हाकत आहेत. पहिल्या आधार कार्ड लाभार्थीचा सन्मान मिळाल्यानंतरही, त्यांना आजही आपल्या उदरनिर्वाहासाठी कठोर परिश्रम करावे लागत आहेत.
(नक्की वाचा- Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO)
रंजनाताई सोनवणे यांचे हे उदाहरण आहे की, योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रभावीपणे आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे किती महत्त्वाचे आहे. देशातील पहिल्या आधार कार्ड लाभार्थीला पंधरा वर्षांनंतरही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असेल, तर कोट्यवधी सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. सरकारने रंजनाताईंच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने 'आधार' द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.