सुरज कसबे, प्रतिनिधी
देशांतर्गत विमानसेवेतील महत्त्वाच्या इंडिगो एअर लाईन्समध्ये झालेल्या गोंधळामुळे फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः मावळ परिसरातील सुप्रसिद्ध गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे १० कोटींचे नुकसान...
गेल्या पाच दिवसांत देशभरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुलाब उत्पादनात मावळचा मोठा वाटा आहे. मात्र, इंडिगोच्या गलथान कारभारामुळे मावळातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. देशात दररोज सुमारे ४० लाख गुलाब फुलांची वाहतूक होते. यापैकी जवळपास २५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख गुलाबांची वाहतूक ही हवाई मार्गाने केली जाते. मात्र, इंडिगो एअरलाईन्सच्या कामातील गोंधळामुळे ही लाखो फुले विविध विमानतळांवर पडून आहेत. वेळेवर ग्राहकांपर्यंत न पोहोचल्याने ही फुले खराब झाली आहेत. एका गुलाबाला सध्या सुमारे २० रुपये दर मिळत आहे. या दराचा विचार केल्यास, केवळ एका दिवसात फुल उत्पादक शेतकऱ्यांचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोटींची गुलाबं विमानतळावर पडून...
गेल्या पाच दिवसांचा हिशोब केल्यास, संपूर्ण देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. फुले ही नाशवंत असल्याने, विमानतळावर पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता हे मोठे नुकसान कोण भरून देणार? असा संतप्त सवाल या निमित्ताने देशभरातील आणि विशेषतः मावळातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने आणि संबंधित विमान कंपनीने या नुकसानीची तत्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.