VIDEO: 'लग्न साधं केलं तरी पोरं होतात', मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज ट्रोल

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे हा साखरपुडा पार पडला. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, संगमनेर

महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला. मात्र या साखरपुड्याच्या कार्यक्रमाची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून नेहमीच लग्न साधेपणाने करा आणि अनावश्यक खर्च टाळा असा उपदेश केला आहे. मात्र त्यांच्या मुलीचा साखरपुडा मात्र लाखो रुपये खर्च करून मोठ्या दिमाखात पार पडल्याने, त्यांच्या उपदेशावर आणि कीर्तनातील सामाजिक संदेशांवर प्रश्नचिन्हे उभी करण्यात येत आहेत. 

डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्यासह अनेक लोकांनी इंदुरीकर महाराजांवर टीका केली आहे. तळेकरांनी म्हटलं की, "आम्हाला वाटले महाराज उपदेश देतात 'लग्न साधे करा तरी पण पोरं होतात' पण येथे तर महाराजच बिघडले, उपदेशाच्या विपरीत वागू लागले. साखरपुड्याला लाखो रुपये खर्च केला, लग्नात तर कोट्यवधी रुपये खर्च नक्की केला जाईल."

पाहा VIDEO

महाराज तुम्ही दररोज उपदेश करता लग्न साधे करा. मग तुम्हाला ही दुर्बुद्धी कशी झाली? येथून पुढे तुम्ही उपदेश देणे बंद करा. जर तुम्हालाच तसे वागता येत नाही, तर तुम्ही दुसऱ्याकडून ही अपेक्षा का करता? वारकरी पंथाला आणि कीर्तनकाराला हे शोभत नाही, असंही सुभाष तळेकर यांनी म्हटलं. 

साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा दिमाख

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे हा साखरपुडा पार पडला. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे. लॉन्सचे एका दिवसाचे भाडे सुमारे दीड लाख रुपयांच्या आसपास होते. मोठ्या प्रमाणात सजवलेली वाहने आणि अन्य व्यवस्था देखील तिथे होती.

Advertisement

जेवण साधे, पण  विविध पदार्थ मेन्यूमध्ये होते. भव्य सजावट, वधू-वरांसाठी आगमन रथ, फॉग स्टाईलने अंगठी घालणे, फोटोग्राफर आणि रील मेकरची व्यवस्था होती. महाराजांच्या उपदेशानुसार, खुर्ची प्रथा बंद करण्यात आली होती आणि सर्वांसाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती, यात राजकीय मंडळी देखील खाली बसल्याचे दिसले.

इंदुरीकर महाराज काय म्हणाले?

टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराजांनी आपल्या बाजूने खुलासा केला आहे. "मला काही लोकांची तक्रार आली की, मी साध्या पद्धतीने लग्न करा, असे सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटात केला. हा साखरपुडा त्यांना दाखवण्यासाठी केला. आपण बदल करू शकतो, बदल करण्याची आपली ताकद आहे. कार्यक्रमात कोणाचाही सत्कार केला नाही आणि दुष्काळग्रस्तांना 1,11,101 रुपयांची मदत देण्यात आली. जेवण साधे आणि महाराष्ट्रीयन होते, चायनीज जेवण नव्हते. वाढणाऱ्यांचा ड्रेस वारकरी वेशातील होता.

Advertisement

इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमातील काही चांगल्या गोष्टींवर लक्ष वेधले असले, तरी त्यांच्या उपदेशाच्या विपरीत साखरपुड्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला आहे.

Topics mentioned in this article