मंगेश जोशी, जळगाव:
Heatwave Death: राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. उष्माघाताने बळी गेल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच भयंकर घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या मोहाडी येथील 20 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाला असून उष्मघाताने नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे. वैशाली सुनील मोरे (भील) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. वैशाली ही पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेड येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेली होती.
तिथून घरी परत आल्यानंतर अचानक चक्कर येऊन कोसळल्याने व उष्मघाताचे लक्षण जाणवू लागल्याने तात्काळ वैशालीला नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच नवविवाहिता वैशाली मोरे हिचा मृत्यू झाला. दरम्यान 23 एप्रिल रोजी वैशालीचा विवाह झाला होता, मात्र विवाहाच्या 20 दिवसांनी वैशालीचा मृत्यू झाल्याने सासर व माहेरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
दरम्यान, राज्यात उष्माघाताच्या रुग्णांसह उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात एकूण 175 उष्माघाताचे रुग्ण असून आत्तापर्यंत 6 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण नंदुरबार 22, छत्रपती संभाजीनगर 20, नाशिक 19 अमरावती 15 बुलढाणा 14 रुग्ण आढळले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world