जाहिरात

Heat Alert : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर, 2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला

राज्यातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर अद्यापही कायम असून शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले.

Heat Alert  : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर,  2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला
Jalgaon Heat Wave 2026

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

Jalgaon Heat Wave Latest Update : राज्यातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर अद्यापही कायम असून शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी तापमानाने तब्बल 45 अंशांचा टप्पा पार केल्यानंतर नागरिक अक्षरशः हैराण झाले होते.सध्या तापमानात किंचित घट झाली असली तरी उन्हाचा तडाखा आणि उकाडा कायम असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते तुलनेने ओस पडलेले दिसून येत असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे बाजारपेठा,चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः दुपारी 12 ते  4 या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दिवसभर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना सर्वाधिक फटका

उष्णतेच्या लाटेमुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि दिवसभर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना सर्वाधिक फटका बसत आहे. शेतमजूर,बांधकाम कामगार तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन,थकवा आणि चक्कर येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

नक्की वाचा >> Crime News: मिरा-भाईंदरमध्ये खतरनाक लव्ह ट्रँगल, एका तरुणीशी 2 मुलांचे प्रेमसंबंध, अपहरण, सिगारेटचे चटके अन्..

जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान,हवामान विभागाने पुढील चार दिवस जळगाव जिल्ह्यात तापमान 42 अंशांच्या पुढेच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे,डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे,दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, तसेच हलका आहार घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

नक्की वाचा >> NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड

पर्यावरणप्रेमींनी नागरिकांना केलं मोठं आवाहन

जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली असून अनेक ठिकाणी थंड पेये,उसाचा रस,लिंबूपाणी आणि फळांच्या रसांच्या दुकानांवर गर्दी वाढताना दिसत आहे. दुसरीकडे प्रखर उन्हामुळे जनावरे आणि पक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून पर्यावरणप्रेमींनी नागरिकांना पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. एकूणच,जळगाव जिल्ह्यावर उष्णतेचे सावट कायम असून पुढील काही दिवस नागरिकांना आणखी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com