Maharashtra Weather Update : हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा कमी झाला आहे. रविवारी मुंबईतील किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसात मध्य प्रदेश आणि जवळील भागात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये रात्रीचं तापमान दोन ते चार अंशांनी खाली राहण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वरपेक्षा जळगावही झाले थंड
रविवारी जळगावचा पारा १०.५ अंश सेल्सियस तर महाबळेश्वरचे तापमान १३.२ अंश सेल्सिअर नोंदविण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच जळगावने महाबळेश्वरला मागे टाकले. यावेळी मुंबईचे तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. याशिवाय बीड ११.८, नाशिक १२.५, अहिल्यानगर १२.५, छत्रपती संभाजीनगर १२.८, महाबळेश्वर १२.८, परभणी १२.६, मालेगाव १४, पुणे १४.३, सातारा १४.५, धाराशिव १५, नांदेड १५.१, सोलापूर १५.६, नंदुरबार १६.२, सांगली, १६.९, माथेरान १७.४, मुंबई १९.६ तर ठाणे २३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
नक्की वाचा - Jalna News : तो 24 अन् ती 38 वर्षांची; प्रेमाचा भयंकर शेवट पाहून गावही हादरलं!
थंडी वाढणार....
पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडे १० नोव्हेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता आहे. याचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रात होत असून तापमानाचा पारा २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. यासोबत विदर्भात पुढील दोन दिवस किमान तापमान २ डिग्रीने कमी होण्याची शक्यता आहे, सध्या मुंबईत सकाळच्या वेळेत हवेत गारवा जाणवत आहे. मात्र दिवसा उकाडा जाणवत आहे.