मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News: चाळीसगाव तालुक्यातील बेपत्ता 9 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील तीन दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता होती. कुटुंबीय आणि पोलिसांकडून मुलीचा शोध सुरु होता. दरम्यान गावाशेजारील विहिरीत मुलीचा आज मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीतून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
शाळेतून घरी परतत असताना मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली झाली होती. तीन दिवस उलटूनही चिमुकलीचा शोध न लागल्याने पालकांची चिंता वाढली होती. पोलिसांनी युद्ध पातळीवर चिमुकलीचा शोध सुरू केला होता. विशेष म्हणजे गावालगत शेतशिवारात चिमुकलीचे दप्तर आढळले होते. दरम्यान चिमुकलीचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. यावरूनच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र मुलीचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी टाहो फोडला.
12 डिसेंबरला चिमुकली बेपत्ता
चाळीसगाव तालुक्यातील 9 वर्षीय चिमुकली गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होती. 12 डिसेंबर रोजी ही चिमुकली सकाळी 10 वाजता शाळेत गेली. सायंकाळी चिमुकलीचे आई-वडील शेतातून घरी आल्यानंतर ती घरात दिसून न आल्याने आई-वडिलांनी शाळेत जाऊन चिमुकलीचा शोध घेतला. मात्र मुलगी 5 वाजताच शाळेतून घरी गेल्याचे शिक्षकांनी पालकांना सांगितले. त्यामुळे पालकांनी व इतर कुटुंबीयांनी गावात इतरत्र चिमुकलीचा शोध घेतला.
(नक्की वाचा- Thane News: मंच सजला, कार्यकर्ते जमले अन् एक फोन... एकनाथ शिदेंनी रोखला मयूर शिंदेचा भाजप प्रवेश?)
सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद
मुलगी सापडली नाही तेव्हा गावातील तरुणांनी गावातील एका भागात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तेव्हा चिमुकली दप्तर घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे उघड झाले. मात्र त्यानंतर ही चिमुकली कुठे न दिसल्याने गावाच्या परिसरात कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी शोध घेतला त्यावेळी शेत शिवारात तिचे दप्तर आढळून आले होते. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसराचा शोध घेतला. मात्र मुलगी कुठेही न मिळून आल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी युद्ध पातळीवर चिमुकलीच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली होती.
(नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)
अखेर मुलगी सापडली, मात्र अनेकांचा मनात असलेली भीती खरी ठरली. मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी आता खुनाच्या अँगलने तपास सुरु केला आहे. मुलीची हत्या कुणी आणि का केली? लैंगिक अत्याचाराची घटना आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.