मंगेश जोशी, जळगाव
समाजात जात–धर्माच्या नावावर तणाव वाढत असताना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातून माणुसकीचा संदेश देणारी घटना समोर आली आहे. मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक ‘खान बाबा' यांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा त्यांनी आयुष्यभर ज्या हिंदू देवर–सोनार कुटुंबासोबत घालवली, त्या कुटुंबाच्या घरातून काढण्यात आली. मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले असून या घटनेमुळे सामाजिक सलोख्याचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे माणुसकीचे नाते अधिक मजबूत असल्याचे दर्शन घडवणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. देवर–सोनार कुंडवाडा परिसरात तब्बल सहा दशकांहून अधिक काळ राहणाऱ्या मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक कासमपूर खान उर्फ ‘खान बाबा' (वय 90 वर्ष) यांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा थेट एका हिंदू कुटुंबाच्या घरातून निघाली. या घटनेमुळे नात्यांपेक्षा मानवता श्रेष्ठ असते, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
खान बाबा हे मूळचे मुस्लिम समाजातील असले तरी त्यांनी आपले आयुष्य यावलमधील देवर–सोनार कुटुंबासोबतच घालवले. तरुणपणी ते या कुटुंबाच्या सराफी पेठेतील दुकानात कारागीर म्हणून रुजू झाले. कालांतराने ते या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनले. दोन पिढ्या उलटल्यानंतरही देवर–सोनार कुटुंबीयांनी खान बाबांना कधीच वेगळे मानले नाही. रक्ताच्या नात्यांपेक्षा जिव्हाळ्याचे नाते श्रेष्ठ असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
वयोमानानुसार कामातून निवृत्त झाल्यानंतरही खान बाबांची सेवा, काळजी आणि सन्मान देवर–सोनार कुटुंबाने शेवटपर्यंत जपला. 3 दिवसांपूर्वी खान बाबांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांबाबत निर्णय घेताना कुटुंबीयांनी एक भावनिक भूमिका घेतली. “खान बाबा आमच्या कुटुंबातीलच सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा आमच्याच घरातून निघावी,” अशी इच्छा देवर–सोनार कुटुंबीयांनी व्यक्त केली. आणि त्यानुसार मुस्लिम रितीरिवाजांनुसार विधी पार पडल्यानंतर खान बाबांची अंत्ययात्रा हिंदू कुटुंबाच्या घरातून निघाली. या वेळी परिसरातील नागरिक, विविध समाजांचे प्रतिनिधी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात अभिमानाची भावना दिसून आली.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यात बस आणि मेट्रो प्रवास मोफत खरंच शक्य आहे?)
आज जिथे जातीय व धार्मिक विद्वेषाच्या घटना सातत्याने चर्चेत आहेत, तिथे जळगावातील ही घटना समाजाला एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे. माणुसकी, आपुलकी आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर उभे राहिलेले नाते कोणत्याही धर्माच्या भिंती ओलांडू शकते, हे खान बाबा आणि देवर–सोनार कुटुंबाने दाखवून दिले. ही घटना केवळ अंत्ययात्रेची नाही, तर एकतेची, सलोख्याची आणि भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्' या विचाराची जिवंत साक्ष आहे.