Jalgaon News : जळगावात उष्णतेचा कहर; 45 दिवसांत 321 मृत्यू, तज्ज्ञांकडून सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून गेल्या दीड महिन्यात तब्बल 321 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मंगेश जोशी प्रतिनिधी

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून गेल्या दीड महिन्यात तब्बल 321 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या मृत्यूंमध्ये 63 टक्के मृत्यू हे ज्येष्ठ नागरिक आणि विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांचे असल्याचं स्पष्ट झालं आहे. एप्रिल ते मे दरम्यान सातत्याने वाढलेल्या तापमानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचं चित्र आहे.  दरम्यान रुग्णालयामध्ये येणारे 30% रुग्ण हे उष्माघात सदृश्य रुग्ण आहे. मात्र उष्माघात मृत्यूची एकही नोंद अद्याप जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात करण्यात आलेली नाही. 

जळगाव शहरासह जिल्ह्यात मागील 45 दिवसांपैकी तब्बल 3 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे राहिले. अनेक दिवस तापमानाने 43 ते 45 अंशांचा टप्पाही गाठला. परिणामी उष्माघात, डिहायड्रेशन, हृदयविकार, मेंदूवरील ताण आणि किडनीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दीड महिन्यात मृत्यू झालेल्यांमध्ये 60 वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आलं आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, श्वसनाचे आजार आणि किडनी विकार असलेल्या रुग्णांवर उष्णतेचा अधिक गंभीर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून रक्त घट्ट होणे, रक्तदाबातील चढउतार आणि मेंदूवरील ताण वाढत आहे.

Advertisement

डिहायड्रेशन आणि उष्माघाताची प्रकरणं वाढली

रुग्णालयांमध्ये उष्माघात, चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, रक्तदाब कमी होणे आणि बेशुद्ध पडणे अशा तक्रारींसह रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्णांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, तीव्र उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा बिघडते. त्यामुळे मेंदू, हृदय, फुफ्फुसे आणि किडनी यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. उष्माघात वेळेत ओळखला गेला नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून केले जात आहे 

शहरातील तापमानाचा वाढता आलेख चिंताजनक

एप्रिल महिन्यापासूनच जळगाव जिल्ह्यात तापमान सातत्याने वाढत गेले. शहरातील काँक्रीटीकरण, वाहनांची वाढ, हरित क्षेत्रात घट आणि हवामान बदल यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. दिवसा रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचेही दिसून येत आहे.

डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला

डॉक्टरांनी नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे, हलका आहार घेणे आणि वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उष्माघात प्रतिबंधक जनजागृती आणि आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. आगामी काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article