- भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने नवविवाहिता वैशाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला
- अपघातात वैशालीच्या काकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत
- वैशाली पाटील यांचा विवाह सहा दिवसांपूर्वी मोठ्या थाटात झाला होता
मंगेश जोशी
हातावरील मेहंदीचा रंग अजूनही तसाच होता. गळ्यातील मंगळसूत्र, कपाळावरील कुंकू आणि नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत होती. त्याच वेळी माहेरी जाण्याचा आनंद मनात घेऊन निघालेल्या नववधूवर मात्र नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत 21 वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील हीचा जागीच मृत्यू झाली. ती अमळनेरच्या कोळपिंप्री गावची राहणारी होती. या अपघातात तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी झाला होता. लग्नाला जेमतेत सहा दिवस झाले होते. तिचं लग्न जळगावातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या थाटात पार पडला होता. लग्नानंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर मांडव परतणीसाठी आणि माहेरी जाण्यासाठी वैशालीचे काका आले होते. जळगाव वरून वैशाली आपल्या माहेरी पाच परतावण्याला जाणार होती. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेर जाणार म्हणून ती ही आनंदात होती. काका तिला नेण्यासाठी आले होते.
दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे रवाना झाले. मात्र दुपारी जवळपास चार वाजण्याच्या सुमारास तिचा अपघात झाला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वैशाली हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काका प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वी लग्नाच्या मंगलध्वनींनी दुमदुमलेले घर एका क्षणात शोकसागरात बुडाले. नवविवाहितेचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश रुग्णालय परिसरातील प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा होता. अवघ्या सहा दिवसांपूर्वी नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या वैशालीचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अज्ञात वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world