मंगेश जोशी
रेल्वे रुळावर घरातील वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने घरी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत होती. मात्र त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती तोच को वृद्ध घरी परतल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकही थक्क झाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या पाळधी येथे हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे. सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील पाळधी रेल्वे स्थानकाजवळ एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. ही बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातील काही लोकांनी रेल्वे रुळाजवळ जाऊन पाहणी ही केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेल्वेरुळावर पडलेला मृतदेह, त्याचे कपडे, चेहरा मोहरा हा गावातल्या रघुनाथ खैरनार याच्या सारखा गावकऱ्यांना वाटला. खैरनार यांचे वय 65 वर्षे होते. शिवाय ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्याचे वय ही साधारण पणे तेवढेच होते. त्यामुळे हा मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याची खात्री पटली. कुटुंबीयांनीही त्यांची ओळख पटवली. त्यांच्या मृत्यू मुळे खैरनार यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. रघुनाथ खैरनार यांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी बोलावण्यात आलं. त्यांचा मुलगा पुण्याला राहातो. त्यालाही याची माहिती देण्यात आली.
रघुनाथ खैरनार यांचा मुलगा हा तातडीने पुण्यावरून गावी येण्यासाठी निघाला. विशेष म्हणजे खैरनार यांच्या नातलगांनी मृतदेहाची ओळख पटवली होती. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा ही केला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन ही केले गेले. खैरनार यांच्या घरी सर्व नातेवाईक जमले होते. त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरु केली होती. त्याच वेळी ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती ते रघुनाथ खैरनार हे घरी परतले. रघुनाथ खैरनार समोर उभे ठाकल्याने त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक हे हादरले. त्यांना एक धक्काच बसला.
रघुनाथ खैरनार हे वृद्ध दोन दिवसापासून गुजरात मधील सुरत व अहमदाबाद येथे गेले होते. मात्र पाळधी रेल्वे स्थानकाजवळ रघुनाथ खैरनार यांच्यासारख्याच व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यामुळे सुरत वरून येताना कदाचित रघुनाथ खैरनार रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज हा वर्तवला जात होता. चेहरा आणि अंगावरचे कपडे हे देखील जवळपास सारखे असल्याने खैरनार यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळख पटवली. रघुनाथ खैरनार हे मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्याने कायम ते फिरत असतात. सुरतला गेल्यानंतर तेथून रघुनाथ खैरनार हे अहमदाबाद येथे गेले. तिथून रेल्वेने ते घरी परतले. घरी परतताच रघुनाथ खैरनार यांच्या कुटुंबियांना धक्का बसत अश्रू अनावर झाले.
शवविच्छेदनानंतर रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पाळधी येथे घेऊन जात असताना रघुनाथ खैरनार हे घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचाही गोंधळ उडाला मात्र मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात परत पाठविण्यात आला. आता या संपूर्ण घटनेमुळे रघुनाथ खैरनार हे हयात असल्याने नेमका तो मृतदेह कोणाचा याचं मोठं कोडं पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. पोलिसांकडून सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.