लक्ष्मण सोळुंके, जालना:
Jalna Crime: मौजमजा आणि नशेच्या आहारी गेलेली तरुण पिढी गुन्हेगारीकडे कशी वळतेय, याचा धक्कादायक प्रत्यय जालन्यात आला आहे. एका १९ वर्षीय तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने चार मित्रांनी मिळून एका व्यक्तीला लुटल्याची घटना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मात्र, चोरीच्या पैशात झिंगलेल्या या तरुणांची नशा पोलिसांनी काही तासांतच उतरवली असून, चौघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी लुटमार...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर परिसरातून निलेश अशोक अग्रवाल हे रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या स्कुटीवरून घरी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अग्रवाल यांच्या नाक आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांच्याकडील १२ हजार रुपयांची रोकड हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या लुटमारीनंतर तरुणांनी हॉटेलमध्ये जाऊन मद्यप्राशन आणि जेवणाची जंगी पार्टी केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता, बाळा जगन्नाथ पिंपराळे, दिपक भगवान निर्मल, विशाल धुराजी हिवाळे आणि त्यांच्या एका साथीदाराची माहिती समोर आली.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे हवे होते म्हणून हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली. चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या पार्टीसाठी तरुणांनी थेट लुटमारीचाच कट रचल्याच्या प्रकाराने जालना जिल्हा हादरुन गेला आहे.
Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं