Jalna Nagar Parishad Result 2025 : जालन्यात भाजपाचे कमळ फुलले,पण दानवेंच्या भोकरदनमध्ये 'तुतारी'चा दणदणाट

Jalna Parishad 2025 Election Result : जालन्यातील तीन नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jalna Parishad 2025 Election Result : जालना जिल्ह्यातील एका निकालानं सर्वांनाच धक्का बसला आहे.,
जालना:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Jalna Parishad 2025 Election Result : जालन्यातील तीन नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.  जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपली ताकद दाखवून दिली असून अनेक बड्या नेत्यांना या निवडणुकीत धक्क्याचा सामना करावा लागला आहे. तीनपैकी दोन नगर परिषदांवर भाजपाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे, तर एका ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बाजी मारली आहे.

परतूर आणि अंबडमध्ये भाजपाचा झेंडा

जालन्यातील परतूर नगर परिषदेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या ठिकाणी भाजपने मोठी मुसंडी मारत काँग्रेसच्या हातातील सत्ता खेचून आणली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियांका राक्षे यांनी 1800 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे यांचा पराभव केला. या निकालामुळे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना मोठा राजकीय धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

( नक्की वाचा : Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं )

दुसरीकडे, अंबड नगर परिषदेत भाजपने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. येथे भाजपच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी या विजयी झाल्या आहेत. अंबडमध्ये भाजपने आपली पकड मजबूत ठेवल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या बालेकिल्ल्यात सत्ता राखण्याचे आव्हान असताना भाजपच्या विजयाने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

रावसाहेब दानवेंना मोठा हादरा

भोकरदन नगर परिषदेच्या निकालाने मात्र भाजपला मोठा धक्का दिला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सत्ता काबीज केली आहे. या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समरीन मीरझा यांनी विजय मिळवत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना धोबीपछाड दिली आहे. या निकालामुळे भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या राजकीय ताकदीला धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण )
 

भोकरदनमध्ये विजय मिळवताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार मिरवणूक काढली. विशेष म्हणजे, भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या घरासमोरच माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि त्यांच्या समर्थकांनी विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. जिल्ह्याच्या या तीन नगर परिषदांच्या निकालाने आगामी विधानसभा आणि इतर स्थानिक निवडणुकांसाठी नवे संकेत दिले आहेत.