लक्ष्मण सोलुंके, प्रतिनिधी
"चोरीचा मामला अन हळू हळू बोंबला"... असं म्हणण्याची वेळ आता जालना, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांवर आली आहे.
पत्रकाराच्या कारची चोरी करून त्याच कारमधून तीन चोरांनी पाच दिवसात मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 7 चोऱ्या केल्याचं समोर आलंय. चोरांनी चोऱ्यावर चोऱ्या करण्याच्या सपाटाचं लावल्याने या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती असताना चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय.
जालना जिल्ह्यातील अंबड शहरात 16 जुलै रोजी एका दैनिक वृत्तपत्राच्या तालुका प्रतिनधीच्या घरासमोरून तीन चोरांनी कारची चोरी केली. सकाळी आपली कार चोरी गेल्याचे लक्षात येताच पत्रकार असलेल्या मंगेश कारके यांनी अंबड पोलीस ठाण्यात कार चोरी गेल्याची तक्रार दाखल केली.अंबड पोलीस आणि स्वतः पत्रकाराने कारचा शोध घेत असताना चोरट्याने याचं कारचा वापर करून जळगाव जिल्ह्यात 17 जुलैच्या रात्रीच्या सुमारास 5 ठिकाणी दुकानात चोरी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.
नक्की वाचा - Kolhapur Crime : 'वैभ्या तुझी आता काही खैर नाही'; तलवारी घेऊन पाठलाग, प्रेमविवाह करणं पडलं महागात?
पोलीस चोरांचा शोध घेत असतानाचं याचं चोरांनी पुन्हा 20 जुलैला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंद गावातील मेडिकल स्टोअर्सचे आणि आणखी काही दुकानात चोरी केल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता याचं चोरीच्या कारचा वापर करून चोरट्यांनी चोऱ्या केल्याचं पुन्हा सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं. या चोरट्यांनी पत्रकाराची कार चोरून त्याच कारचा वापर करून सीसीटीव्ही असलेले 7 दुकानेचं फोडल्याने वाद निर्माण झाला आहे.
पत्रकार असल्याचं भासवत लावला चोरीचा सपाटा
या चोरांनी आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून अंबड शहरातील पत्रकार असलेल्या मंगेश कारके यांच्या MH-12 DM 8706 या सिलव्हर रंगांची मारुती कारची चोरी केली. कारच्या काचेवरील PRESS हे लिहिलेलं नाव न काढता नामी शक्कल लढवत कुणाला संशय येऊ नये म्हणून पत्रकार असल्याचं भासवलं. असं करीत त्याने तब्बल 7 ठिकाणी चोऱ्या केल्या. पत्रकारची कार चोरी करीत गुन्हा केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. गेल्या सहा दिवसात तरी या आरोपींना आणि कार पकडण्यात यश आलेलं नाही.