लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
51 Rupee Saree Offer Jalna: जालना शहरातील जुना मोढा परिसरात असलेल्या अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्समध्ये एका साडी सेंटरने दिलेल्या जाहिरातीमुळे शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. 500 रुपयांची साडी अवघ्या 51 रुपयांत देण्याची ऑफर सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता परिसरातील शेकडो महिलांनी या दुकानाबाहेर एकच गर्दी केली. स्वस्तात साडी मिळवण्याच्या नादात महिलांनी दुकानासमोर मोठी रांग लावली होती, मात्र काही वेळातच या गर्दीचे रूपांतर गोंधळात झाले.
नियोजन कोलमडले आणि...
दुकान व्यवस्थापनाने 51 रुपयांची आकर्षक ऑफर तर दिली, पण येणाऱ्या गर्दीचे कोणतेही आगाऊ नियोजन केले नव्हते. दुकानाबाहेर महिलांची संख्या इतकी वाढली की रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. दुकानात घुसण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ सुरू झाली आणि काही महिलांनी थेट दुकानात शिरून साड्यांची मागणी लावून धरली.
वाढत्या गर्दीमुळे दुकानदार आणि तिथले कर्मचारी पूर्णपणे गोंधळून गेले होते. परिस्थिती इतकी बिघडली की अखेर या ऑफरचा फज्जा उडाला आणि दुकानातील व्यवहार ठप्प झाले.
( नक्की वाचा : Beed News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; वाल्मिक कराडच्या मुलाच्या एका पोस्टने राजकारण तापले )
पोलिसांची कारवाई
जुना मोढा परिसरातील ही गंभीर परिस्थिती लक्षात येताच सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन दुकानदाराला कडक समज दिली. ही वादग्रस्त ऑफर त्वरित बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले, कारण यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस आल्यानंतरही महिलांची गर्दी कमी होत नव्हती. महिलांना पांगवताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित दुकान बंद करण्यात आले आणि जमावाला तिथून हटवण्यात आले.
अशा प्रकारे मोठ्या सवलतींच्या ऑफर देताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचे कोणतेही नियम पाळले नसल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले आहे. पोलिसांनी दुकानदाराला समज दिली असली तरी, नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आता सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन या दुकानदारावर पुढे काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण जालना शहराचे लक्ष लागले आहे.