योगेश लाठकर, प्रतिनिधी
Miyazaki mango price : एक आंबा थेट 10 हजार रुपयाला असल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? दहा हजार रुपयांना एक आंबा म्हणजे आंबा खायचा की नाही याचा दोनदा विचार करावा लागेल. पण प्रत्यक्षात असा एका आंबा आहे ज्याचा दर प्रतिनग दहा हजार रुपये इतका आहे. नांदेड जिल्ह्यातील भोसी या गावातील एका तरुण शेतकऱ्याने या महागड्या आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. हा आंबा मूळचा जपान देशातील असून त्याची नांदेडमध्ये यशस्वी लागवड करण्यात आली आहे. जाणून घेऊया या मियावाकी आंब्याविषयी...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दहा हजार रुपयांना एक आंबा मिळणाऱ्या या झाडाची अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते. नंदकिशोर गायकवाड पोटच्या पोराप्रमाणे या आंब्याची काळजी घेत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. हा आंबा साधासुधा आंबा नसून नंदकिशोर यांचे नशीब बदलणारा आंबा आहे. हा एक आंबा नंदकिशोर यांना तब्बल दहा हजार रुपये मिळवून देणारा आहे. या आंब्याचे नाव आहे मियावाकी. हा आंबा मूळचा जपान देशातील आहे. या आंब्याची माहिती घेत नंदकिशोर यांनी तो फिलिपिन्स या देशातून मागवला. साडेसहा हजार रुपयांना एक रोप मिळालं आहे. त्यांनी दहा रोपे मागवली, यासाठी त्यांना 65 हजार मोजावे लागले. या आंब्याची शेतात दोन वर्षांपूर्वी लागवड करण्यात आली. यंदा त्याला फळधारणा झाली. बाजारात या आंब्याला तब्बल दहा हजार रुपये प्रतिनग मागणी आली. डायबिटीज पेशंटसाठी हा आंबा सुरक्षित आहे. यात अनेक पोषक तत्तव आहेत, असे नंदकिशोर सांगतात. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे हा आंबा महाग आहे असे ते सांगतात.
नक्की वाचा - Job Opportunities : पुणे की बंगळुरू, कोणतं शहर नोकरदारवर्गासाठी बेस्ट? 'त्या' LinkedIn पोस्टवरुन चर्चेला उधाण
नंदकिशोर हे कोविडपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. तिथे त्यांना या आंब्याची माहिती मिळाली. कोविडमुळे परीक्षा लांबल्या. आता त्यांनी थेट आपले गाव गाठत शेतात राबायला सुरुवात केली. संपूर्ण माळरानावर त्यांचे शेत. या शेतात काम करताना गावकरी त्यांना हसायचे. इथे काय फुलणार असं त्यांना वाटायचे, पण जिद्द इतकी की नंदकिशोर यांनी इथे हिरवे नंदनवन फुलवलं. त्यातून वर्षाकाठी तब्बल 50 लाख रुपयांचे उत्पन्न विविध फळांच्या माध्यमातून मिळवले. आता त्यांना हसणारे गावकरी त्यांचेच तोंडभरून कौतुक करतात.
नंदकिशोर यांना मियावाकीच्या 10 झाडांपासून सध्यातरी 4 लाख रुपये मिळणार आहेत. आंबे आणखी लागले तर उत्पन्नाचा आकडा वाढणार आहे. शेतात नुकसानच जास्त होते असे म्हणणारेही अनेकजण आहेत. पण उजाड माळरानावर नंदनवन फुलवणारा हा नंदकिशोर शेतीतला जितंराम मांझी शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.