Jejuri Bhandara Policy: जेजुरीच्या खंडोबा गडावर उधळला जाणारा 'येळकोट येळकोट'च्या गजरातील पवित्र 'हळद भंडारा' आता केवळ श्रद्धेचा विषय न राहता कायदेशीर चौकटीत येणार आहे. जेजुरीत भंडाऱ्यामुळे आग लागण्याच्या घटना आणि भेसळीच्या तक्रारी पाहता, भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित केले जाणार असून, त्यात शुद्धता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
काय आहे नवीन धोरण?
जेजुरी गडावर काही दिवसांपूर्वी भंडारा उधळताना आग लागल्याची गंभीर घटना घडली होती. या मुद्द्यावरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत आमदार विक्रम पाचपुते, आमदार महेश शिंदे आणि आमदार राजू नवघरे यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भंडाऱ्यात होणारी भेसळ ही केवळ श्रद्धेचा प्रश्न नसून भाविकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने, सरकारने आता कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
विक्रेत्यांना अन्न परवाना बंधनकारक
जेजुरी आणि इतर देवस्थानांच्या ठिकाणी विकला जाणारा 'हळद भंडारा' हा शुद्ध हळदीच्या स्वरूपातच असावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. आता प्रत्येक विक्रेत्याला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 नुसार अधिकृत अन्न परवाना घेणे अनिवार्य असेल. विनापरवाना किंवा भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
(नक्की वाचा : Edible Oil: विदेशी तेलाचा विळखा सुटणार! देशात खाद्य तेलात क्रांती होणार; पाहा काय आहे केंद्र सरकारचा नवा प्लॅन )
प्रशासनाकडून अंमलबजावणीचे आदेश
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाला काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत, त्या खालीलप्रमाणे:
सुरक्षितता नियम: मंदिर परिसरात भंडारा उधळताना आगीसारख्या घटना टाळण्यासाठी विशेष सुरक्षितता नियम लागू केले जातील.
जनजागृती आणि फलक: भाविकांना शुद्ध आणि भेसळयुक्त भंडाऱ्यातील फरक समजावा, यासाठी ठिकठिकाणी माहितीफलक लावले जातील.
आरोग्य तपासणी: आरोग्य विभागाद्वारे भंडाऱ्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबवली जाईल.
( नक्की वाचा : LPG Crises: एलपीजी गॅसची कटकट मिटणार! मोदी सरकारचा 3 लाख कोटींचा मेगा प्लॅन; इंधन क्षेत्रात मोठी क्रांती! )
कायदेशीर वर्गीकरण आणि शुद्धता
सामान्यतः 'भंडारा' म्हणजे अन्नदान समजले जाते, परंतु जेजुरीत तो पूजेचा मुख्य घटक आहे. जर हळदीचा वापर औषध किंवा सौंदर्यासाठी केला तर त्याचे नियम वेगळे असतात, पण जेजुरीतला हळद भंडारा हा 'धार्मिक विधी' आणि 'प्रसाद' म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासन त्याचे विशेष नियमन करणार आहे.
"जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची शुद्धता राखणे ही आमची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे जेजुरीतील भंडाऱ्याला आता एक कायदेशीर ओळख मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world