सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून प्रत्येक उमेदवार प्रचाराला लागला आहे. मतदारसंघातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून उमेदवार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला जनतेला देखील दिसत आहे. राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लढतींपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ. भाजपचे राम शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीचे रोहित पवार यांच्यात ही लढत होत असून सध्या स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा प्रचारात गाजत आहे.
2019 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात सरळ सरळ लढत झालेली पाहायला मिळाली. या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 47 हजार 347 मतांनी पराभव केला. गेल्या वेळी रोहित पवार यांची पाटी कोरी होती तरी देखील भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा गाजला. या वेळेस पाच वर्षात रोहित पवारांनी केलेल्या विकास कामांचा हिशोब होणार आहे तरीदेखील पुन्हा एकदा यंदाच्या निवडणूक प्रचारामध्ये स्थानिक भूमिपुत्रविरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा गाजत आहे. आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांनी आपला तो आपलाच असतो, स्थानिक भूमिपुत्र मुद्दा पुढे करत आहेत. गेल्या पाच वर्षात रोहित पवारांनी कोणतीही महत्वपूर्ण कामे न केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जात आहे.
नक्की वाचा -Mohol Vidhan Sabha : रमेश कदमांची कन्या सिद्धी कदम यांची उमेदवारी बदलली, ऐनवेळी एबी फॉर्म केला रद्द!
राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी भुमिपुत्रविरुद्ध बाहेरचा उमेदवार या सुरू केलेल्या मुद्द्यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले स्थानिक भूमिपुत्र हा प्रश्न विचारायाचाच असेल तर राम शिंदे यांनी चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी यांना पण विचारावा. मी पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशोब पुराव्यासहित मांडतो. त्यांनी देखील पाच वर्षाची कामे केली ती दाखवावी असा टोला देखील राम शिंदे यांना लगावला...
तर दुसरीकडे रोहित पवारांच्या पक्षातील पदाधिकारी सोडून जात आहेत. रोहित पवार पदाधिकाऱ्यांना विचारात न घेताच कामे करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. एकीकडे भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार या मुद्द्याला तोंड देत असतानाच पदाधिकाऱ्यांच्या भावना देखील जपणं रोहित पवारांना महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे त्यांची एकंदरीत तारेवरची कसरत होत असलेली पाहायला मिळते. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसीचा मुद्दा, दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न, एस आर पी एफ प्रशिक्षण केंद्राचा श्रेय वादाचा मुद्दा याचबरोबर भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हे मुद्दे गाजणार आहे. येणाऱ्या काळात कर्जत जामखेडची जनता कोणाच्या बाजूने कौल देतील हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे...