गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या करुळ घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, हा घाट 12 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात दरड कोसळली. यामुळे मोठे दगड आणि चिखल रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आठ दिवस काम चालणार
या घाटात यापूर्वीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. ज्यामुळे सैल झालेले खडक हटवणे आवश्यक आहे. या कामासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची टीम बोलावण्यात आली असून, हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता, जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हा महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली आहे.
पर्यायी मार्गांची माहिती
वाहनचालकांनी या कालावधीत खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्ग, देवगड-निपाणी राज्य महामार्ग पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे: यासोबतच, बंद करण्यात आलेला रस्ता आणि पर्यायी मार्गांची माहिती दर्शवणारे फलक व वाहतूक चिन्हे लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देशही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सुरक्षा जपली जाईल.