मुंबई: पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात. या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छादूत म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिले. आज (दिनांक 20 जानेवारी) बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित 'सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आजाराबाबतच्या माहिती पुस्तिकेचे अनावरणही याप्रसंगी करण्यात आले. तसेच केईएम रूग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्त विशेष पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एखाद्या संस्थेच्या इतिहासात 100 वर्षांचा कालावधी हा अतिशय मोठा कालावधी असतो. वेगाने बदलणार्या जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवा-सुविधाही अतिशय वेगाने बदलत आहेत. जनसेवेचे व्रत घेतलेल्या केईएम संस्थेच्या यशामध्ये आणखी 100 वर्षांची भर पडावी, अशा शुभेच्छा बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी याप्रसंगी दिल्या. याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी यांनी श्री अमिताभ बच्चन यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ विपिन शर्मा, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत,निष्णात शल्यचिकित्सक डॉ जयंत बर्वे, आदी मान्यवर उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातमी - त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट
'कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य वैद्यकीय सल्ला हा कोणत्याही आजारावर उपचारासाठी महत्वाचा ठरतो. अद्दयावत तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात अतिशय वेगाने वापर होतो आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकातील वैद्यकीय शल्यचिकित्सा क्षेत्रात झालेल्या बदलांबाबतही त्यांनी याप्रसंगी भाष्य केले. गेल्या अनेक वर्षात सातत्याने वैद्यकीय क्षेत्राने आपल्याला कशा पद्धतीने जीवनदान दिले याबाबतच्या आठवणीही त्यांनी याप्रसंगी जागृत केल्या. कूली चित्रपटाच्या निमित्ताने अपघातात मिळालेले उपचार, टीबी आजाराच्या निमित्ताने मिळालेले उपचार, यकृताचा आजार याप्रसंगी योग्य उपचार मिळाल्याने आयुष्यमान वाढल्याचे श्रेय त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाला दिले. आगामी काळातही जनसेवेचा वारसा केईएम रूग्णालयात शिक्षण घेणाऱ्या नव्या उमेदीच्या डॉक्टरांनी कायम ठेवावा, अशी अपेक्षाही बच्चन यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
कोव्हिडच्या कालावधीत डॉक्टरांनी रूग्णसेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुकही श्री. अमिताभ बच्चन यांनी याप्रसंगी केले. अनेकदा डॉक्टरांच्या आश्वासक हमी मुळेच रूग्णांचा 50 टक्के आजार बरा होतो. त्यामुळे मानवतेसाठी सुरू असणारे अविरत कार्य हे समाजातील शेवटच्या घटकाचा लाभ होईल या उद्देशाने केईएम रूग्णालयाच्या माध्यमातून अखंडितपणे व्हावे, अशी. सदिच्छाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सदिच्छा दूत म्हणून मोहिमेसाठी बळ देणार
अमिताभ बच्चन हे प्रामुख्याने नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत (ब्रॅण्ड एम्बेसेडर) म्हणून कार्यरत राहण्याबाबत यावेळी घोषणा केली. नॉन-अल्कोहोलिक सोरायसिस या आजारामध्ये फॅटी लिव्हरमुळे रूग्णाला सोरायसिस होऊ शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे तरूणाईत वाढणाऱ्या या आजारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या बाह्य रूग्ण विभागाची सुरूवात केईएम रूग्णालयात करण्यात आली. प्रत्येक शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही ओपीडी कार्यरत असणार आहे.
नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (नॅश - NASH) हा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) चा एक प्रकार आहे. यकृताच्या या आजाराचे निदान करुन उपचार घेणे गरजेचे आहे. याकरिता सदर आजारांवरील उपचारासाठी केईएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओपीडी स्थापन केली जाणार आहे. या ओपीडीमध्ये दर शुक्रवारी रुग्णांना तपासणी आणि उपचार सेवा मिळणार आहे.
NASH च्या उपचारासाठी ही ओपीडी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. यामुळे या आजाराबाबत जागरूकता वाढवणे आणि योग्य उपचार मिळवणे सोपे होणार आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आकाश शुक्ला यांच्या चमूच्या माध्यमातून या ओपीडीची सुरूवात करण्यात आली आहे.